देशात कोरोनावरील दोन लसींना मंजुरी

- लवकरच देशभरात लसीकरण सुरू होणार

लसींना मंजुरीनवी दिल्ली – ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) कोरोनावरील दोन लसींना रविवारी मंजुरी दिली. ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ तसेच ‘भारत बायोटेक’ व ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च’ने (आयसीएमआर) मिळून विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ यांना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे अभिनंदन केले असून हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे म्हटले आहे. याआधी ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने या दोन्ही लसींना आपत्कालीन मंजुरी देण्याची शिफारस ‘डीसीजीआय’ला केली होती. त्यानंतर लवकरच यासंदर्भात ‘डीसीजीआय’ निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार रविवारी सकाळी याबाबत घोषणा करण्यात आली. यामुळे लवकरच भारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होईल. यावर जनसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून कोरोनाच्या साथीतून आपली सुटका होईल, असा विश्‍वास जनसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ही लस विकसित करणार्‍या संशोधकांचे अभिनंदन केले. कोरोनाच्या विरोधातील लढाईत हा निर्णायक टप्पा ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही (डब्ल्यूएचओ) भारतात कोरोना लसींना मिळालेल्या मंजुरीचे स्वागत करण्यात आले आहे. यामुळे दक्षिण आणि पूर्व आशियात कोरोनाच्या साथीविरोधातील लढाईला बळ मिळाल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

कोरोनावरील लस लवकरच येईल असे संकेत गेल्या महिनाभरापासून केंद्र सरकारकडून दिले जात होते. ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या व ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’कडून निर्मिती करण्यात येत असलेल्या ‘कोविशिल्ड’ला सोमवारी सीडीएससीओने मान्यता दिली होती. ‘कोविशिल्ड’च्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. ‘भारत बायोटेक-आयसीएमआर’च्या ‘कोव्हॅक्सिन’च्याही मंजुरीची शिफारस तज्ज्ञांकडून ‘डीसीजीआय’ला करण्यात आली होती. ‘कोव्हॅक्सिन’च्याही अंतिम टप्प्यातील काही चाचण्या सुरू आहेत. मात्र या दोन्ही संस्थांकडून आपल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी सरकारकडून परवानगी मागण्यात आली होती.

आतापर्यंत झालेल्या चाचणीचे अहवाल तपासून आणि त्याच्या सुरक्षेबाबात खात्री पटल्यानंतर तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ‘डीसीजीआय’ने या दोन्ही लसींना मंजुरी दिली. याशिवाय ‘झायडस कॅडिला’च्या तिसर्‍या टप्प्यातील क्रिनिकल चाचण्यांनाही ‘डीसीजीआय’ने मंजुरी दिली आहे. ३० हजार स्वयंसेवक या चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहेत.

भारतात एकाच वेळी दोन लसींना मंजुरी मिळाली आहे आणि तिसर्‍या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईत भारतीय संशोधकांनी दिलेले योगदान खूप मोलाचे ठरेल, असा दावा केला जात आहे. त्याचवेळी ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची ओळख पटविण्यातही भारतीय संशोधकांना यश मिळाले असून पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच’च्या संशोधकांनी ही कामगिरी करून दाखविली आहे.

leave a reply