अफगाणिस्तानच्या शाळेतील आत्मघाती स्फोटात 23 विद्यार्थ्यांचा बळी

- बळींची संख्या शंभरावर असल्याचा स्थानिक पत्रकाराचा दावा

23 विद्यार्थ्यांचा बळीकाबुल – राजधानी काबुलमधील शालेय इमारतीत दहशतवाद्यांनी घडविलेल्या भीषण आत्मघाती स्फोटात 23 विद्यार्थ्यांचा बळी गेला. पण स्थानिक पत्रकाराने शुक्रवारच्या स्फोटात शंभरजणांचा बळी गेल्याचा दावा केला आहे. त्यातच तालिबानने विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात परवानगी नाकारल्याच्या बातम्याही येत आहेत. त्यामुळे या स्फोटात अधिक जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास काबुलच्या सेक्टर 13 येथील दश्त-ए-बार्ची या भागातील शाळेत जोरदार स्फोट झाला. यामध्ये 23 जणांचा बळी तर 100 जण जखमी झाल्याचे काबुल पोलीसा च्या प्रवक्त्याने जाहीर केले. अफगाणिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या हजारा समुदायाचे वास्तव्य भागात हा स्फोट झाला. अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण गेल्या वर्षभरात हजारा समुदायाला लक्ष्य करणाऱ्या ‘आयएस-खोरासन’ ही दहशतवादी संघटना यासाठी जबाबदार असल्याचा दावा केला जातो.

अफगाणिस्तानातील स्थानिक पत्रकाराने शुक्रवारच्या स्फोटात किमान शंभर विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचा दावा केला. या विद्यार्थ्यांचे मृतदेह पाहिल्याचे या पत्रकाराने सोशल मीडियामध्ये सांगितल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांवर आयएसचे हल्ले वाढत असून तालिबान फक्त कारवाईची भाषा करीत आहे. आयएसविरोधात कारवाई करीत नसल्याची टीका अफगाणिस्तान तसेच शेजारी देश इराणमधून होत आहे.

leave a reply