रिझर्व्ह बँकेकडून सलग चौथ्यांदा व्याजदरात वाढ

- रेपोदर अर्ध्या टक्क्यांनी वाढून 5.90 टक्क्यांवर

व्याजदरात वाढमुंबई – अपेक्षेप्रमाणे ‘आरबीआय’ने व्याजदरात वाढ केली आहे. शुक्रवारी द्विमाही पतधोरण आढाव्यात रेपो दरात 50 बेसिक पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला. यामुळे व्याजदर आता तीन वर्षांच्या उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. यामुळे सर्व प्रकारची कर्जे येत्या काळात अधिक महाग होणार आहेत. मात्र शेअर बाजारात या दरवाढीला सकारात्मक घेण्यात आले असून महागाईदर अजून 6 टक्क्यांच्यावर असताना हा निर्णय अपेक्षितच होता, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर जानेवारी महिन्यानंतर महागाईदर नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक शुक्रवारी संपन्न झाली. या बैठकीत सहा पैकी पाच समिती सदस्यांनी रेपोदरात वाढीचे समर्थन केले. त्यामुळे बहुमताचा विचार करीत समितीने हा निर्णय घेतला. या निर्णयाबरोबर रेपोदर अर्धा टक्क्यांनी वाढून 5.90 टक्क्यांवर गेले आहेत. एप्रिल 2019 सालानंतरचे हे सर्वाधिक व्याजदर आहेत. गेल्या सलग चार पतधोरणात आरबीआयने व्याजदरात वाढ केली आहे व मे महिन्यांपासून हे व्याज दर 190 बेसिक पॉईंट अर्थात 1.9 टक्क्यांनी वाढले आहे.

जगभरात महागाईचा भडका दिसून येत आहे. भूराजकीय तणाव, जागतिक अर्थव्यवस्थेची अवस्था, रुपयाच्या मूल्यातील घसरण आणि महागाईदरातील वाढ यामुळे आरबीआयवर व्याजदर वाढीचा दबाव होता. जागातिक बहुतांश देशांच्या केंद्रीय बँकांनी सध्याच्या परिस्थितीत व्याजदर वाढीचे निर्णय घेतले आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा 75 बेसिक पॉईंटने व्याजदर वाढविले होते. यामुळे भारतीय रुपयांवरील दबाव वाढला होता.

व्याजदरात वाढमात्र चलनाचे मूल्यातील चढउतारामुळे पतधोरण प्रभावित होत नसल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. तर पतधोरण हे महागाई दर आणि देशाचा आर्थिक विकास व तत्सम मुद्यांशी जोडलेली असते, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात महागाई दरात किंचित वाढ झाली होती.

या पार्श्वभूमीवर आरबीआयने व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. देशांतर्गत अन्नधान्याच्या किंमती वाढत आहेत. खरिपाचे पिक कमी येण्याची शक्यता वर्तविली जाते. खरिपातील अन्नधान्याचे उत्पादन घटले, तर खाद्यान्नांच्या किंमतीवर नक्कीच परिणाम होईल. तसेच मान्सून परत फिरण्यास उशीर झाल्याने भाजीपाल्यासारख्या नाशवंत मालाच्या किंमतींवरही परिणाम होत आहे. यामुळे महागाईदरावर विपरित परिणाम झाल्याचे शक्तीकांत दास यांनी महागाई दरात झालेल्या वाढीचा दाखला देताना म्हटले आहे. तसेच कोरोनाचे संकट सरल्यानंतर सुरू झालेल्या युक्रेन युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवत असल्याचेही गव्हर्नर दास यांनी स्पष्ट केले.

पण जागतिक परिस्थितीमुळे वाढणाऱ्या महागाईचे विकसित आणि उभरत्या बाजारपेठांवर दिसून येणाऱ्या परिणामांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचेही गव्हर्नर दास यांनी अधोरेखित केले. मात्र यावर्षीच्या आर्थिक विकासाचा अंदाज आरबीआयने 7.2 टक्क्यांवरुन 7 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.

दरम्यान, शेअर बाजारात मात्र आरबीआयच्या पतधोरणाचे जोरदार स्वागत झाले आहे. शुक्रवारी आरबीआयचे पतधोरण जाहीर झाल्यावर मुंबई सेन्सेक्सने 1100 अंकांची जोरदार उसळी मारली. सलग सात दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदारांना चार लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारल्याचे पहायला मिळाले.

leave a reply