चीनच्या घुसखोरीनंतर भारताने लडाखमधील तैनाती वाढविली – हिमाचलमध्ये लष्कराचा जागता पहारा

नवी दिल्ली – सिक्किम, हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्ये घुसखोरी करून भारताला आव्हान देणाऱ्या चीनला रोखण्याची पूर्ण तयारी भारताने केली आहे. या सीमाक्षेत्रात भारताने आपली सैन्यतैनाती वाढली असून हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पिती येथील सीमाभागात ‘इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस’ अर्थात आयटीबीपी तसेच लष्कराचे जवान देखील गस्त घालत आहेत. याद्वारे भारताकडून  चीनला  सज्जड इशारा दिला जात आहे.

कोरोनाव्हायरसविरोधी लढ्यात सारे जग गुंतलेले असताना, या परिस्थितीचा फायदा उचलून चीनने आपल्या वर्चस्ववादी हालचाली वाढविल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यात भारताच्या सीमाक्षेत्रात चीनच्या सुरू असलेल्या कुरापती हेच संकेत देत आहेत. सिक्कीम आणि लडाखमधील घटनांनी भारतीय लष्कराला अधिक सावध केले आहे. कारण सिक्कीमच्या ‘नाकु ला’ खिंडीत चिनी लष्कराने भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. तर लडाखच्या डेमचॉक आणि गलवान नदीजवळ चीनच्या लष्कराच्या हालचाली वाढल्या होत्या. लडाखमधील चीनच्या लष्कराची ही कारवाई  १९६२ सालच्या युद्धाची आठवण करून देत आहे. कारण त्या युद्धाच्या सुरुवातीलाही चिनी लष्कराने गलवान नदीजवळ तंबू ठोकले होते.

यापार्श्वभूमीवर, सावध झालेल्या भारतीय लष्कराने लडाखमधील आपली सज्जता वाढविली असून सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लडाखमधील सीमेच्या सुरक्षेसाठी लष्कराने जादा कुमक तैनात केली आहे. आधीच्या काळात चिनी सैनिकांनी लडाखमध्ये एखाद-दोन दिवस तंबू ठोकून पाहिले होते. पण आता चिनी सैनिकांची घुसखोरी व याचा वास्तव्याचा कालावधी वाढविल्याने भारतीय लष्कराला त्याकडे दुर्लक्ष करता येणे शक्य नाही. म्हणूनच इथे अतिरिक्त तैनाती आवश्यक बनली आहे.

हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पिती सीमाभागातील लष्कर आणि आयटीबीपीची गस्त वाढविली आहे. १९६२च्या युद्धात लाहौल  स्पिती सीमाभाग तुलनेने शांत होता. पण गेल्या काही महिन्यांमधील या क्षेत्रातील चीनच्या हेलिकॉप्टरच्या वाढत्या घिरट्या भारतीय लष्कराने अत्यंत गांभिर्याने घेतल्या आहेत. चीनच्या हेलिकॉप्टरचा वेध घेऊन भारताच्या लढाऊ विमानाने इथून उड्डाण केले होते, ही बाब भारतीय संरक्षण दलांची सतर्कता सिद्ध करण्यासाठी  पुरेशी ठरते.

हिमाचल प्रदेशमधील भारताच्या ज्या सीमेजवळ चीनने हेलिकॉप्टर धाडले होते, तिथून १०० किलोमीटरच्या अंतरावर चीनचा मोठा हवाईतळ आहे. ‘सिंगास्ते’ नावाने ओळखला जाणारा चीनचा हा हवाईतळ भारताच्या हवाई सुरक्षेला आव्हान देणारा असल्याचे मानले जाते. म्हणूनच या क्षेत्रातून भारतात होणाऱ्या चिनी हेलिकॉप्टरच्या घुसखोरीकडे भारतीय लष्कर आत्यंत गांभीर्याने पाहत आहे.

leave a reply