देशात दोन दिवसात कोरोनाचे नवे रुग्ण 50 टक्क्यांनी वाढले

नवी दिल्ली – देशात दिवाळीनंतर नव्या रुग्णांच्या संख्येत 50 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दुपारपर्यंतच्या चोवीस तासात 45 हजार 576 नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच या साथीने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही दोन दिवसात 24 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात आढळणाऱ्या नव्या रुग्णाच्या संख्येत घट दिसून येत होती. देशात चार महिन्यात प्रथमच या साथीच्या चोवीस तासात आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या 30 हजारांच्या खाली गेली होती. मात्र पुन्हा नव्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे दिसत आहे.

कोरोनाचे नवे रुग्ण

सणासुदीच्या काळात बेजबाबदारपणे वागू नका. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छता हेच कोरोनाविरोधात लढण्याची मुख्य शस्त्रे आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार देण्यात येत होता. युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आलेल्या कोरोनाच्या नव्या लाटेने या देशांमध्ये ओढवलेल्या परिस्थीकडे तज्ज्ञ लक्ष वेधत होते. सरकारकडूनही वारंवार इशारे देण्यात येत होते. मात्र सणासुदीच्या काळात उसळलेली गर्दी आणि काही जणांकडून दाखविण्यात येणाऱ्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे दिसत आहे. तसेच गेल्या आठवड्यात सणासुदीच्या काळात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली होती. देशात सरासरी आठ लाख चाचण्या या काळात होत होत्या. मात्र या चाचण्या पुन्हा 10 लाखांच्या पुढे गेल्यानंतर नव्या रुग्णांची नोंदही वाढल्याचे स्पष्ट होते.

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मंगळवारी देशात 29164 नव्या रुग्णाची नोंद झाली होती, तर 449 जण या साथीने दगावले होते. बुधवारी 38 हजार 617 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि 474 जणांचा मृत्यू झाला. तर गुरुवारी दुपारपर्यंतच्या चोवीस तासात 45 हजार 576 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि 585 जण दगावले. यावरून कोरोनाचे नवे रुग्ण आणि बळी पुन्हा वाढू लागल्याचे लक्षात येत आहे.

महाराष्ट्रात दरदिवशी आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या अडीच हजारापर्यँत खाली आली होती. तसेच दरदिवशी या साथीने होणारे मृत्यूही 60 पर्यंत खाली होते. मात्र बुधवारी नऊ दिवसानंतर राज्यात पुन्हा 100 पेक्षा जास्त मृत्यू आणि 5 हजारपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात चाचण्याही कमी झाल्याने नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात दरदिवशी सरासरी एक लाख चाचण्या होत होत्या, तर ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण 60 ते 70 हजारांपर्यंत खाली आले. मात्र दिवाळीच्या काळात कोरोना चाचण्या आणखी 70 टक्क्यांनी कमी झाल्या. राज्यातील दरदिवशीच्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण 25 हजारांपर्यंत खाली आले. त्यानंतर चाचण्यांमध्ये काहीशी वाढ झाली असून 18 नोव्हेंबरला 53 हजार चाचण्या झाल्या. यामुळे या एका दिवसात आढळलेल्या नव्या रुग्णांची संख्या पुन्हा 5 हजारांच्या पुढे गेली आहे.

5 नोव्हेंबरपर्यंत एकट्या मुंबईत दरदिवसाला 14 हजार चाचण्या होत होत्या. मात्र त्यानंतर पुढील दहा दिवसात या चाचण्यांची संख्या 73 टक्क्यांनी घसरून 3 हजार 918 पर्यंत खाली आली. 13 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी 5 हजार 264 चाचण्या मुंबईत घेण्यात आल्या होत्या. मात्र 13 ते 16 नोव्हेंबर दरम्यान चाचण्यांची संख्या पुन्हा सुमारे 50 टक्क्यांनी घटली. 15 नोव्हेंबरला केवळ 2298 चाचण्या झाल्याचे वृत्त अहवाल आहेत. पुण्यातही दरदिवशी होणाऱ्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण 43 टक्क्यांनी कमी झाले आहे. पुण्यात सप्टेंबर महिन्यात दरदिवशी सरासरी 13 हजार चाचण्या होत होत्या. मात्र नोव्हेंबरच्या सुरुवातीला या चाचण्यांची संख्या 8 हजारांपर्यंत खाली आली. तर 15 नोव्हेंबरला केवळ 2900 चाचण्यांची नोंद झाली.

चाचण्यांची संख्या घट झाल्याने तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पुढील काही आठवडे मुंबई, पुण्या सारख्या शहरांसाठी महत्त्वाचे असतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिल्लीप्रमाणे दुसरी लाट दिसून येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुढील काही दिवसात राज्यात विविध भागात पारा घसरेल. त्यामुळे कोरोनाचे संकट आणखी बळावेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चाचण्या वाढल्याशिवाय खऱ्या परिस्थितीचा अंदाज येणार नाही, असाही दावा केला जातो.

leave a reply