इम्रान खान यांच्या सुटकेनंतरही पाकिस्तानातील तणाव कायम

इस्लामाबाद – आपल्या अटकेनंतर समर्थकांना रस्त्यावर उतरण्याची चिथावणी देणाऱ्या इम्रान खान यांनी जामीनावर सुटका झाल्यानंतर, पाकिस्तानात झालेल्या हिंसाचाराशी आपला संबंध नसल्याचे जाहीर करून टाकले. माध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी ९ मे रोजी झालेल्या आपल्या अटकेमागे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर असल्याचा ठपका ठेवला. तर गेल्या तीन दिवसात पाकिस्तानात झालेल्या हिंसाचार व जाळपोळीत भाग घेणाऱ्यांना अटक करण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अधिकाऱ्यांना ७२ तासांची मुदत दिली आहे. त्याचवेळी इम्रान खान व त्यांचे सहकारी दहशतवाद्यांपेक्षा कमी नाहीत, अशी जळजळीत टीका पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे.

इम्रान खान यांच्या सुटकेनंतरही पाकिस्तानातील तणाव कायमइस्लामाबाद उच्च न्यायालयाने संरक्षण देऊन इम्रान खान यांना सर्वच प्रकरणांमध्ये जामीन दिला. यानंतर पाकिस्तानातील हिंसाचार थांबल्याचे दिसत आहे. मात्र अजूनही पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. कारण माध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी ९ मे रोजी आपल्या अटक नाही, तर आपले अपहरण झाले, असा दावा केला. या अपहरणाला पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर जबाबदार असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. संपूर्ण लष्कर नाही, तर जनरल मुनीर या एका व्यक्तीमुळे आपल्याला अटक झाली, असे सांगून इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्करात लोकशाही नसल्याचे म्हटले आहे.

इम्रान खान यांच्याकडून असे आरोप होत असताना, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी देशात मार्शल लॉ लागू करण्याची शक्यता फेटाळली. राजकीय विसंवाद असला तरी पाकिस्तानात मार्शल लॉ लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जनरल मुनीर यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानी लष्कराचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास असल्याचा टोला देखील जनरल मुनीर यांनी लगावला आहे. तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर घणाघाती टीका केली. इम्रान खान नियाझी आणि त्यांचे समर्थक दहशतवाद्यांपेक्षा कमी नाहीत, असा ठपका ठेवला.

एखादी दहशतवादी किंवा देशविरोधी संघटना गेल्या सात दशकात करू शकली नाही, ते इम्रान खान व त्यांच्या समर्थकांनी करून दाखविले, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ पुढे म्हणाले. त्याचवेळी हिंसाचार करणाऱ्या इम्रान खान यांच्या समर्थकांची ओळख पटवून त्यांना पुढच्या ७२ तासात अटक करण्याची सूचना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे.

याआधी पाकिस्तानात झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या इम्रान खान यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशारा अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिला होता. त्यामुळे पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर पुन्हा एकदा इम्रान खान यांना गजाआड करण्याची तयारी करीत असल्याचे दावे त्यांच्या समर्थकांनी केले होते. तर इम्रान खान यांच्या पक्षाच्या काही नेत्यांनी तर पाकिस्तानातील हिंसाचार व लष्करी अधिकाऱ्यांवरील हल्ल्यमागे देखील लष्कराचाच हात असल्याचे म्हटले होते. असे हल्ले घडवून पाकिस्तानचे लष्कर इम्रान खान यांना बदनाम करीत आहे व त्यांना नव्या प्रकरणांमध्ये अडकविण्याची तयारी करीत असल्याचे या समर्थकांचे म्हणणे आहे.

यामुळे इम्रान खान यांच्या जामीनावरील सुटकेनंतरही पाकिस्तानातील तणाव कायम असल्याचे दिसते आहे. पाकिस्तानचे लष्कर व सरकार इम्रान खान यांच्यावर नवी कारवाई करणार असेल, तर आधीपेक्षाही भयंकर परिस्थिती उद्भवू शकते, असे इशारे खान यांचे समर्थक देत आहेत. तर कुठल्याही परिस्थितीत देशविरोधी कारवाया खपवू घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी इम्रान खान यांना मोकळे सोडले जाणार नाही, असा संदेश दिला आहे. पाकिस्तानातील काहीजणांनी तर इम्रान खान यांच्या समर्थकांविरोधात जनतेला रस्त्यावर उतरविण्याची भाषा सुरू केली आहे.

दरम्यान, ‘तेहरिक-ए-पाकिस्तान तालिबान’ या दहशतवादी संघटनेने इम्रान खान यांची बाजू घेतली आहे. या दहशतवादी संघटनेचा कमांडर सरबाकफ मोहम्मद याने इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानी लष्करावर चढविलेले हल्ले योग्यच ठरतात, असा दावा केला. गेल्या दोन दिवसात इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानी लष्करी अधिकारी व जवानांवर हल्ले चढवून आपला हेतू साध्य केला, असे सांगून सरबाकफ मोहम्मद याने यासाठी त्यांची प्रशंसा केली. तेहरिक’ने गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराच्या अधिकारी व जवानांवर जीवघेणे हल्ले चढविले आहेत. यात पाकिस्तानी लष्कराला फार मोठी हानी सहन करावी लागली. अशा दहशतवादी संघटनेच्या कमांडरने इम्रान खान व त्यांच्या समर्थकांची प्रशंसा करून या सर्वांसमोरील अडचणी वाढविल्या आहेत.

हिंदी

 

leave a reply