पाश्चिमात्य देशांबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या लष्कराचा होर्मुझच्या आखाताजवळ युद्धसराव

तेहरान – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी होर्मुझ आणि ओमानच्या आखाती क्षेत्रात मोठा सराव सुरू केला आहे. येत्या काळात इराणवर हल्ला झाला किंवा इराणमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झालाच तर त्याचा मुकाबला करण्यासाठी या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर कुठल्याही प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न केलाच तर जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिला होता. जागतिक इंधन व इंधनवायूच्या वाहतुकीचा मुख्य मार्ग असणाऱ्या सागरी क्षेत्रात या सरावाचे आयोजन करून इराणने अमेरिका तसेच इस्रायलला धमकावल्याचे दिसत आहे.

इराणच्या सरकारशी संलग्न असलेल्या संकेतस्थळाने ‘झोल्फाघर-1401’ या युद्धसरावाची माहिती दिली. यामध्ये इराणच्या लष्कराबरोबरच हवाई आणि नौदलाने देखील सहभाग घेतला आहे. इराणच्या लष्कराचे रणगाडे, लष्करी चिलखती वाहने तसेच विमानभेदी तोफा आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या गस्ती नौका यावेळी लाईव्ह फायर ड्रिलमध्ये सहभागी होणार आहेत. तर इराणनिर्मित ड्रोन्स आणि बॉम्बर विमाने या सरावाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.

रशियाने युक्रेनमधील युद्धात इराणकडून खरेदी केलेल्या ड्रोन्सचा वापर केल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या सरावात इराण कोणत्या ड्रोन्सचे शक्तीप्रदर्शन करणार, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष असेल, असे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे. युक्रेन युद्धात इराणी बनावटीच्या ड्रोन्सचा वापर करण्यात आलेला नाही, असे रशिया तसेच इराण सांगत आहे.

काही तासांपूर्वीच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिका आणि इस्रायलला शत्रू जाहीर करून नवी धमकी दिली होती. येत्या काळात अमेरिका, युरोप, इस्रायल किंवा या क्षेत्रातील अमेरिकेच्या अरब मित्रदेशांनी हल्ला चढविलाच तर या शत्रूदेशांना जोरदार उत्तर मिळेल, असा इशारा इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला.

गेल्या चार महिन्यांपासून सरकारविरोधातील निदर्शने पेटवून पाश्चिमात्य मित्रदेश इराणविरोधात कारवाईचे कारण शोधत आहेत. इराणमध्ये सैन्य घुसविण्याचा इरादा पाश्चिमात्य देश बाळगून असल्याचा दावा इराणी माध्यमे व विश्लेषक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारपासून सुरू झालेला ‘झोल्फाघर-1401’ युद्धसराव इराणच्या शत्रू देशांना जोरदार प्रत्युत्तर देणारा असेल, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply