परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याकडून पाकिस्तान व चीनला समज

निकोसिया – ‘दहशतवादाचा वापर करून भारताला वाटाघाटी करण्यास भाग पाडता येऊ शकत नाही. भारताला सर्वांबरोबर उत्तम संबंध हवे आहेत. पण भारत दहशतवादाला सामान्य बाब बनवण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही. शेजारी देशांबरोबर उत्तम संबंध ठेवणे, म्हणजे दहशतवादाकडे दुर्लक्ष करणे ठरत नाही’, अशा खणखणीत शब्दात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली. सायप्रसच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधताना थेट नामोल्लेख न करता पाकिस्तान व चीनबाबतचे देशाचे धोरण स्पष्ट केले.

भारताचे चीनबरोबरील संबंध सुरळीत नाहीत, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. कोरोनाची साथ आलेली असताना, भारताच्या सीमेवर आव्हान उभे करण्यात आले होते. पण बळाचा वापर करून एलएसीवरील यथास्थिती बदलण्याचे प्रयत्न भारत कधीही खपवून घेणार नाही, असे परराष्ट्रमंत्र्यांनी ठासून सांगितले. याद्वारे भारत व चीनच्या ताणलेल्या संबंधांना चीनच्या कारवाया जबाबदार असल्याची जाणीव करून दिली.

दरम्यान, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या सायप्रस दौऱ्यात, भारत आणि सायप्रसमध्ये तीन सहकार्य करार संपन्न झाले आहेत. यामध्ये संरक्षणविषयक मोहिमांबाबतचे सहकार्य, स्थलांतरीत आणि त्यांच्या वैध स्थानांतरणाबाबतचे सहकार्य तसेच इंटरनॅशनल सोलर अलायन्सबाबतच्या करारांचा यात समावेश आहे. भारत व सायप्रसमध्ये राजनैतिक संबध प्रस्थापित होऊन 60 वर्षे पूर्ण झाली असून दोन्ही देश पुढच्या काळात आपले सहकार्य अधिकच व्यापक करण्यासाठी उत्सुक असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या दौऱ्यात स्पष्ट झाले आहे.

leave a reply