वायुसेनेची चीनच्या हालचालींवर करडी नजर

वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरून संपूर्ण सैन्यमाघार झाल्याखेरीज इथली स्थिती सामान्य पातळीवर आल्याचा दावा करता येणार नाही, असे वायुसेनाप्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी बजावले आहे. चीनच्या भारतातील राजदूतांनी एलएसीवरील स्थिती स्थीर असल्याचे सांगून याबाबतचा वाद संपुष्टात आल्याचे दावे केले होते. त्यावर वायुसेनाप्रमुखांची ही प्रतिक्रिया आल्याचे दिसते. तसेच एलएसीच्या हवाई हद्दीतील चीनच्या हालचालींवर वायुसेनेची करडी नजर रोखलेली आहे, याचीही जाणीव वायुसेनाप्रमुखांनी करून दिली.

China's movementsनवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, वायुसेनाप्रमुखांनी नेमक्या शब्दात एलएसीसंदर्भातील वायुसेना व संरक्षणदलांची भूमिक मांडली. चीनचे भारतातील राजदूत सन वुईडाँग यांनी एलएसीवर शांतता प्रस्थापित झाल्याचे सांगून याबाबतचा वाद संपुष्टात आल्याचे दावे ठोकले होते. पण लडाखच्या एलएसीवरून संपूर्ण सैन्यमाघार भारताला अपेक्षित असून त्याखेरीज इथली परिस्थिती पूर्वपदावर आल्याचे दावे करता येणार नाही, असे संकेत वायुसेनाप्रमुखांनी पत्रकारांशी बोलताना दिले. इतकेच नाही तर एलएसीवरील चिनी हवाई दलाच्या कारवायांवर वायुसेनेची करडी नजर रोखलेली आहे. भारताच्या हवाई हद्दीचे उल्लंघन झाल्यानंतर, ही समस्या सोडविण्यासाठी चीनबरोबरील हॉटलाईनचा वापर केला जाईल, अशी माहितीही यावेळी वायुसेनाप्रमुखांनी दिली.

हा वाद चिघळू नये, यासाठी वायुसेना व संरक्षणदलांकडून प्रयत्न केले जातील. मात्र परिस्थिती उद्भवलीच, तर वायुसेना कुठल्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असे एअर चीफ मार्शल चौधरी यांनी स्पष्ट केले. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आता अत्याधुनिक रफायल लढाऊ विमाने, एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणा आली असून यामुळे वायुसेनेची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, याची जाणीवही वायुसेनाप्रमुखांनी यावेळी करून दिली. वायुसेना कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगून युक्रेनच्या युद्धाकडे वायुसेना अत्यंत बारकाईने पाहत असल्याचेही वायुसेनाप्रमुखांनी स्पष्ट केले. भविष्यातील युद्ध छोटे, जलद हालचालींचे आणि प्रचंड तीव्रतेचे असू शकेल. त्याचवेळी भविष्यातील युद्ध रशिया व युक्रेनमधील युद्धाप्रमाणे दिर्घकाळ चालणारेही असू शकते. वायुसेनेने या दोन्ही प्रकारच्या युद्धांची तयारी केलेली आहे, असा आत्मविश्वास वायुसेनाप्रमुखांनी व्यक्त केली.

युक्रेनच्या युद्धापासून भारतीय संरक्षणदलांनी बरेच धडे घेतल्याचे आधीच्या लष्करप्रमुखांनी जाहीर केले होते. वायुसेनाप्रमुख देखील जवळपास त्याच शब्दात युक्रेनच्या युद्धाकडे आपण गांभीर्याने पाहत असल्याचे म्हटले आहे. या युद्धात वापरली जाणारी शस्त्रास्त्रे त्यांचा प्रभाव याच्या नोंदी भारतीय संरक्षणदलांकडून घेतल्या जात आहेत. त्यानुसार अत्यावश्यक ते बदलही घडविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, याची जाणीव संरक्षणदलांच्या प्रमुखांनी देशवासियांना करून दिली होती.

leave a reply