पाकिस्तानी लष्कर आणि तेहरिक-ए-तालिबानमध्ये संघर्ष

पेशावर – तेहरिक-ए-तालिबानने पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतात केलेल्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराच्या चार जवानांना ठार केले. याचे फोटोग्राफ्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. तर सप्टेंबर महिन्यात तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये खूप मोठी वाढ झाल्याची माहिती पाकिस्तानच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने दिली आहे. पण पाकिस्तानच्या लष्कराने या दोन्ही बातम्यांबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले असून याउलट अफगाण तालिबान आणि तेहरिक यांच्यातच संघर्ष पेटल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये सोडल्या आहेत.

pak talibanअफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीने मध्यस्थी करून तेहरिक-ए-तालिबान आणि पाकिस्तानमध्ये संघर्षबंदी घडविली होती. पण दोन्ही गटांकडून संघर्षबंदीचे उल्लंघन होत असल्याचे सातत्याने आरोप सुरू होते. पाकिस्तानच्या लष्कराने संघर्षबंदीच्या काळात तेहरिकच्या समर्थकांवर कारवाई केल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर तेहरिकने देखील ड्युरंड सीमेवर पाकिस्तानी जवानांवर हल्ले सुरू केल्याची माहिती सोशल मीडियावर उघड झाली होती.

तेहरिक-ए-तालिबानबरोबरील संघर्षबंदी फिस्कटल्यानंतर पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील संघर्ष तीव्र झाल्याचे दावे माध्यमांमधून केले जात होते. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानच्या पश्चिमेकडील सीमाभागात 31 ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले असून यामध्ये 37 जणांचा बळी गेल्याचा अहवाल ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडिज्‌‍’ या पाकिस्तानी अभ्यासगटाने प्रसिद्ध केला. सप्टेंबर महिन्यात तेहरिकचे हल्ले वाढले असून यात सुरक्षा दलांच्या जवानांचा सर्वाधिक बळी गेल्याचे या अभ्यासगटाने म्हटले आहे.

तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या जवानांचा सर्वाधिक बळी जात असल्याचा दावा या अभ्यासगटाने केला. पाकिस्तानातील आघाडीच्या वर्तमानपत्राने सदर अहवाल प्रसिद्ध करून पाकिस्तानच्या लष्कराला कोंडीत पकडले. त्यातच खैबर-पख्तूनख्वाच्या कुर्राम जिल्ह्यातील खारलाची सीमेजवळ तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे आणखी काही जवान ठार झाल्याची माहिती समोर आली. तेहरिकच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या या माहितीबरोबरच ठार झालेल्या पाकिस्तानी जवानांचे फोटोग्राफ्स देखील प्रसिद्ध केले. यामुळे पाकिस्तानी लष्कराला यावर प्रतिक्रिया देणे भाग पडले आहे.

पाकिस्तानच्या लष्कराने स्थानिक अभ्यासगट आणि तेहरिकचे दावे खोडून काढले. तसेच पाकिस्तानी लष्कराने टँक भागात केलेल्या कारवाईत तेहरिकच्या चार दहशतवाद्यांना मारल्याचे जाहीर केले. तसेच अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात अफगाण तालिबान आणि तेहरिकच्या दहशतवाद्यांमध्ये संघर्ष भडकल्याच्या बातम्या पाकिस्तानी लष्कराने सोशल मीडियावर सोडल्या आहेत. तेहरिकच्या प्रमुखाने तालिबानविरोधी संघर्षासाठी तयार राहण्याची सूचना केल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. पण तालिबानसंलग्न सोशल मीडियातून पाकिस्तानी लष्कराच्या दाव्याला छेद देण्यात येत आहे. चर्चेतून सारे वाद मिटले असून तालिबान आणि तेहरिकचे कमांडर्स एकत्र आल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

दरम्यान, तेहरिकने ड्युरंड सीमा ओलांडून लष्करावरील वाढविलेले हल्ले पाकिस्तानसाठी आव्हान ठरत आहेत. ड्युरंड सीमा मान्य करण्यास तयार नसणाऱ्या तेहरिकने पाकिस्तानच्या अटकपर्यंतचा भूभाग ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानातील कट्टरपंथीय नेते तसेच लष्करातील काही अधिकारी देखील तेहरिकच्या पाठिशी असल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानच्या लष्करासमोरील हे सर्वात मोठे आव्हान ठरते आहे.

leave a reply