अफगाणिस्तानच्या हवाई हल्ल्यात ११ तालिबानी ठार

काबूल – अफगाणिस्तानच्या फरयाब प्रांतात अफगाणी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ११ तालिबानी ठार झाले आहेत. तसेच तालिबानचा तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती अफगाणिस्तानच्या ‘२०९ शहिन आर्मी कॉर्प्स’ने दिली. दोनच दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने ४४ तालिबानींना ठार केले होते. अफगाणिस्तान आणि तालिबानची शांतीचर्चा जवळ आलेली असताना, अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाचे तालिबानवरचे हल्ले लक्ष वेधून घेणारे ठरतात.

११ तालिबानी

रविवारी अफगाणिस्तानच्या फरयाब जिल्ह्यातील कुर्मा कुल जिल्ह्यात सुरक्षा दलाने तालिबानच्या तळावर हवाई हल्ले चढविले. यात ११ तालिबानी ठार झाले. तसेच तालिबानचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला. तालिबानने अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही. नुकतेच अफगाणी सुरक्षा दलाने कुंदुझ प्रांतात ४४ तालिबानींना ठार केले होते. तसेच तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागांवर अफगाणी लष्कराने पुन्हा नियंत्रण मिळविले आहे.

लवकरच अफगाणी सरकार आणि तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरु होणार आहे. त्यासाठी अफगाणी सरकारने विशेष कौन्सिलची स्थापना केली होती. त्याचवेळी अफगाणी सुरक्षा दल आणि तालिबानमध्ये संघर्ष पेटला आहे. त्यामुळे शांतीचर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानच्या अमेरिकेच्या तळांवर हल्ले चढवून शांतीकरार धोक्यात आणल्याचा आरोप ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने केला आहे. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झाल्याची बातमी सदर वर्तमानपत्राने अमेरिकी अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिली. तालिबानने अमेरिकेच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ले चढवून अमेरिकेबरोबर झालेला शांतीकरार धोक्यात आणल्याचे सदर बातमीत म्हटले आहे. पण तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे.

leave a reply