गुजरातमध्ये ‘आयएसआय’च्या एजंटला हेरगिरी प्रकरणी अटक

अहमदाबाद – ‘एनआयए’ने रविवारी गुजरातच्या पश्चिम कच्छ भागातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’साठी काम करणाऱ्या एजंटला अटक केली आहे. देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेला पुरवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून एजन्टचे नाव रझाकभाई कुंंभार असे आहे. कुंभार मुंद्रा डॉकयार्डमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होता. उत्तर प्रदेशातील चांदोली जिल्ह्यातील रशीद नावाच्या इसमाला जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून कुंभारचे नाव समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

हेरगिरी

आयएसआय एजंट म्हणून काम करणाऱ्या कुंभारने रिझवान नावाच्या व्यक्तीच्या खात्यात पेटीएममार्फत पाच हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर हे पैसे रशीदकडे देण्यात आले, असे चौकशीत समोर आले होते. पाकिस्तानमधील आयएसआयच्या हँडलरच्या सूचनेनुसार हे पैसे रशिदला देण्यात आले होते. भारतीय लष्कराच्या हालचालींची आणि भारतातील काही संवेदनशील व महत्वाच्या आस्थापनांचे फोटो रशीदने त्याच्या पाकिस्तानी हॅण्डलरला दिले होते. त्यासाठीच सदर रक्कम देण्यात आली होती.

रशिदने लष्कराव्यतिरिक्त सीआरपीएफच्या तळांची महत्त्वाची माहिती आयएसआयकडे पाठवली होती. तसेच तो दोनवेळा पाकिस्तानला गेला होता. याप्रकरणी जानेवारी महिन्यात एफआयाआर देखील दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना कुंभारबद्दल माहिती मिळाली होती. रशीदची सुरक्षायंत्रणांकडून कसून चौकशी सुरु होती. आयएसआय एजंट रशीदनंतर कच्छ येथून पकडलेल्या कुंभारच्या मोबाइलवरून सैन्याशी संबंधित पुरावे पाकिस्तानला पाठविण्यात आल्याचेही समोर येत आहे.

भारतात हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी आयएसआयकडून सहाय्य करण्यात येते. पण भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे हे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. भारतात अशांतता पसरवण्यासाठी आयएसआय पंजाबमधील दहशतवादही पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही समोर येत असून त्यासाठी खलिस्तानी गटांना सहकार्य करण्यात येत आहे.

leave a reply