अल कायदाचा नवा प्रमुख इराणमध्ये आहे

संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष अहवाल

sayf al adel qaeda leader in iranन्यूयॉर्क – ओसामा बिन लादेनचा अंगरक्षक आणि अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याच्या दहशतवाद्यांचा प्रशिक्षक सैफ अल-अदल हा अल कायदाचा नवा प्रमुख बनला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात अयमन अल-जवाहिरी ठार झाल्यानंतर अल कायदाचा प्रमुख म्हणून सैफची निवड झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या विशेष अहवालात केला आहे. अल कायदाचा हा नवा प्रमुख इराणमध्ये दडलेला असून तेथील त्याचा फोटोग्राफ काही दिवसांपूर्वीच समोर आला होता, याकडेही राष्ट्रसंघ लक्ष वेधत आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका इमारतीवर ड्रोन हल्ला चढविला होता. ओसामा बिन लादेन याच्या खातम्यानंतर अल कायदाची सूत्रे हाती घेणारा अयमन अल-जवाहिरी या हल्ल्यात ठार झाल्याचा दावा अमेरिकेने केला होता. सुरुवातीला अल कायदा तसेच अफगाणिस्तानात राजवट असलेल्या तालिबानने हे दावे फेटाळले होते. पण काही दिवसातच तालिबानने देखील जवाहिरी ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याची कबुली दिली होती. तेव्हापासून अल कायदाने आपल्या संघटनेच्या प्रमुख नेत्याची घोषणा केली नव्हती.

sayf al adel qaeda leaderया काळात अल कायदाच्या प्रमुख पदासाठी वेगवेगळ्या दहशतवाद्यांची नावे समोर आली होती. पण अल कायदाने याबाबत कधीही अधिकृत घोषणा केली नव्हती. तर अमेरिकेनेही यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. अशा परिस्थितीत, संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सैफ अल-अदल याला अल कायदाने आपला नेता म्हणून नियुक्त केले आहे. अमेरिकेच्या मरिन्सनी पाकिस्तानातील ॲब्टाबाद येथील कारवाईत लादेनचा खातमा केल्यानंतर सैफ अल-अदल याने आपले ठिकाण बदलले होते, असे यात म्हटले आहे. अल कायदाचा नवा प्रमुख सध्या कुठे आहे, हे सांगणे कठीण आहे. पण सैफचे शेवटचे ठिकाण इराण होते, हे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनीच स्पष्ट केले होते. त्याचा इराणमधील फोटो देखील अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी प्रसिद्ध केला होता. असे असले तरी अल कायदाच्या प्रमुखाला इराणसारख्या शियापंथिय देशाने आश्रय देणे अवघड असल्याचा दावा काही विश्लेषक करीत आहेत.

leave a reply