इतर देशांना सहाय्य करताना अटीतटी लादण्यावर भारताचा विश्वास नाही

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

बंगळुरू – सहाय्य अपेक्षित असलेल्या देशांना उपदेश करणे आणि गटतटात सहभागी करण्याच्या जून्या मानसिकतेवर भारताचा विश्वास नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. एअरो इंडियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी यासंदर्भातील भारताची भूमिका मांडली.

Rajnath Singhशीतयुद्धाच्या काळात अमेरिका व सोव्हिएत रशिया या महासत्तांमध्ये जगाची विभागणी झाली होती. त्या काळात आपल्याकडून शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची तसेच इतर साहित्याची मागणी करणाऱ्या देशांना या महासत्तांकडून आपल्या गटात सहभागी होण्याची शर्त लादली जात होती. त्याचा अस्पष्टसा दाखला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला असून भारताचा अशा मानसिकतेवर विश्वास नसल्याचे राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले.

संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांचा निर्यातदार म्हणून उदयाला येत असलेला भारत आपल्या ग्राहकदेशांवर अशा अवास्तव अपेक्षा लादणार नाही, असा संदेश राजनाथ सिंग यांनी दिला आहे. सर्वच देश एकसमान आहेत व त्यामुळे कुणालाही दुसऱ्या देशांना उपदेश करण्याचा तसेच त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशी भारताची भूमिका असल्याचे यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ठासून सांगितले. थेट उल्लेख केला नसला तरी रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करू नका, अशी मागणी करून त्यासाठी भारतावर दबाव टाकणाऱ्या अमेरिकेला संरक्षणमंत्र्यांनी लक्ष केल्याचे दिसत आहे.

संरक्षणमंत्र्यांच्या या विधानातून भारताचे परराष्ट्र धोरण स्पष्ट होत आहे. कुठल्याही अटीतटीखेरीज शस्त्रास्त्रे पुरविणारा व इतर देशांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर करणारा भारत हा संरक्षणाच्या बाजारपेठेतील विश्वासार्ह पर्याय म्हणून जगासमोर येत असल्याचा संदेश यावेळी संरक्षणमंत्र्यांनी दिला आहे.

leave a reply