सोमालियात लष्कराने केलेल्या कारवाईत अल-शबाबचे 40हून अधिक दहशतवादी ठार

मोगादिशु – सोमालियाच्या लष्कराने गेल्या 48 तासांमध्ये केलेल्या कारवाईत अल शबाबचे 40हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. गेल्या आठवड्यात अल शबाबने लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात सुमारे 50 जवानांचा बळी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत अल शबाबच्या स्थानिक नेत्यांसह अनेक दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येते.

सोमालियात लष्कराने केलेल्या कारवाईत अल-शबाबचे 40हून अधिक दहशतवादी ठारगेल्या आठवड्यात अल शबाबने गलमुदुग प्रांतातील लष्करी तळावर मोठा हल्ला चढविला होता. यात जवळपास 50 जवानांचा बळी गेला होता व अनेक जवान जखमी झाले होते. या हल्ल्यात अल शबाबच्या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात लष्करी शस्त्रसाठाही ताब्यात घेतला होता. हा हल्ला लष्कराच्या नव्या मोहिमेला मोठा धक्का ठरला होता.

त्यामुळे प्रत्युत्तरादाखल लष्कराने व्यापक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी ‘लोअर शॅबेल’ भागात केलेल्या हल्ल्यात 20हून अधिक दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यासाठी सोमालियात तैनात असलेल्या परदेशी तुकड्यांनीही सहाय्य केल्याची माहिती सोमालियन लष्कराने दिली. या कारवाईनंतर अवघ्या 24 तासांमध्ये मध्य सोमालियातील गलगादुद प्रांतातील मसागावे भागात दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले.

सोमालियात लष्कराने केलेल्या कारवाईत अल-शबाबचे 40हून अधिक दहशतवादी ठारया हल्ल्यात 18हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईत तीन नागरिकांचाही बळी गेल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. सोमालियन लष्कराकडून गेल्या महिन्याभरात करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई ठरते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ईशान्य सोमालियात राबविलेल्या मोहिमेत 43 दहशतवादी ठार झाले होते.

सोमालियाचे राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी अल शबाबविरोधात निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, सोमालियाचे लष्कर देशाच्या विविध प्रांतांमध्ये अल शबाबविरोधात आक्रमक मोहिमा राबवित असल्याचे समोर येत आहे. मात्र लष्करी कारवाईला मर्यादित यश मिळत असून अल शबाबच्या दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता कायम असल्याचे दिसून आले आहे.

leave a reply