अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून अण्वस्त्र धोरण बदलण्याच्या प्रयत्नांना मित्रदेशांचा विरोध

अण्वस्त्र धोरणलंडन/वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून देशाचे अण्वस्त्र धोरण बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार, राष्ट्राध्यक्ष बायडेन अमेरिकी अण्वस्त्रांबाबत ‘नो फर्स्ट युज’ किंवा ‘सोल पर्पज’ असे बचावात्मक धोरण स्वीकारु शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. बायडेन यांच्या या प्रयत्नांना अमेरिकेच्या मित्रदेशांनी जोरदार विरोध सुरू केला असून त्यात युरोपिय देशांसह जपान व ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. अमेरिकेने अण्वस्त्र धोरण बदलल्यास ती चीन व रशियासाठी मोठी भेट ठरेल, असा इशारा युरोपियन अधिकार्‍यांनी दिला.

शीतयुद्धाच्या काळापासून अमेरिकेने आपले अण्वस्त्रहल्ल्याचे धोरण जाणुनबुजून संदिग्ध ठेवल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार, अमेरिका शत्रूचा हल्ला होण्यापूर्वीच त्याच्यावर आण्विक हल्ला चढवू शकतो. अमेरिकेच्या धोरणात युरोप व आशियातील मित्रदेशांना ‘न्यूक्लिअर अम्ब्रेला’च्या रुपात संरक्षण पुरविण्याची ग्वाहीदेखील देण्यात आली आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून हे धोरण बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

अण्वस्त्र धोरणबायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचारमोहिमेत तसेच उपराष्ट्राध्यक्ष असताना ‘सोल पर्पज’ या धोरणाचे समर्थन केले होते. या धोरणानुसार, अमेरिका अण्वस्त्रहल्ला कधी करेल यासंदर्भातील निकष स्पष्ट करण्यात येणार आहेत. त्यात, अमेरिकेवरील थेट हल्ला रोखणे किंवा हल्ला झाल्यावर प्रत्युत्तरासाठी केलेला हल्ला अशा मोजक्या पर्यायांचा समावेश असेल. हे धोरण म्हणजे ‘नो फर्स्ट युज’ या धोरणाचीच आवृत्ती असल्याचे मानले जाते.

वर्षअखेरीस अमेरिकेकडून ‘न्यूक्लिअर पोश्‍चर रिव्ह्यू’ जाहीर होणार आहे. यात बायडेन बदललेले धोरण जाहीर करू शकतात, अशी चिंता अमेरिकेच्या मित्रदेशांकडून व्यक्त करण्यात येते. त्यामुळे युरोप व ‘इंडो-पॅसिफिक’मधील मित्रदेशांनी बायडेन प्रशासनावर दडपण आणण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने आपल्या मित्रदेशांना अण्वस्त्र धोरणाबाबत एक प्रश्‍नावली पाठविली होती. या प्रश्‍नावलीला उत्तर देताना मित्रदेशांनी अण्वस्त्र धोरणातील बदलाबाबत तीव्र नापसंती दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अण्वस्त्र धोरणनुकत्याच झालेल्या अमेरिका व फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांमधील चर्चेतही याचे पडसाद उमटल्याचे सांगण्यात येते. चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात ‘युनायटेड न्यूक्लिअर अलायन्स’च्या मुद्यावर वचनबद्धतेचा समावेश करण्यात आला. त्याचवेळी आण्विक मुद्यांवर अमेरिका फ्रान्सशी सल्लामसलत करेल, असे आश्‍वासनही निवेदनात देण्यात आले आहे. युरोपिय अधिकारी तसेच आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी या मुद्यावर तीव्र चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

बायडेन यांनी अण्वस्त्र धोरणात बदल केल्यास ती चीन व रशियाला मोठी भेट ठरेल, असा इशारा वरिष्ठ युरोपियन अधिकार्‍यांनी दिला. ‘नो फर्स्ट युज’ किंवा ‘सोल पर्पज’ धोरणांवर अमेरिकेचे मित्रदेश विश्‍वास ठेवतील, पण शत्रूदेश कधीच विश्‍वास ठेवणार नाहीत आणि हीच या धोरणाची समस्या आहे, असा दावा मायकल ग्रीन या तज्ज्ञांनी केला आहे. ‘माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीनंतर, रशिया, चीन व उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र धोरणअसणारा धोका वाढला आहे. अशा स्थितीत अमेरिकेचे अण्वस्त्र धोरण बदलण्यासाठी ही योग्य वेळ नाही’, असे ‘सेंटर फॉर ए न्यू अमेरिकन सिक्युरिटी’चे प्रमुख रिचर्ड फॉंटेन यांनी बजावले.

रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जेम्स रिश यांनी, अण्वस्त्र धोरण बदलण्याचा विचार करणे ही गोष्टच अमेरिकेच्या मित्रदेशांचा विश्‍वासघात ठरेल, असे टीकास्त्र सोडले. बायडेन यांनी धोरण बदलल्यास जपान व दक्षिण कोरियासारखे देश अण्वस्त्रनिर्मितीकडे वळू शकतात, असा दावाही विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानातून माघार घेऊन तसेच ‘नॉर्ड स्ट्रीम २’ इंधनवाहिनीच्या मुद्यावर मित्रदेशांना वार्‍यावर सोडल्याची भावना आहे. अशा परिस्थितीत अण्वस्त्र धोरणातील बदल हा फार मोठा धक्का ठरेल, असा इशाराही विश्‍लेषकांनी दिला आहे.

leave a reply