चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून युरोपात सेन्सॉरशिप लादण्याचे प्रयत्न

बर्लिन/रोम – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून आर्थिक व राजनैतिक दडपणाच्या जोरावर इतर देशांमध्ये हस्तक्षेपाचे प्रयत्न होत असल्याचे आरोप अमेरिका व ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी केले होते. आता युरोपातही अशा प्रकारची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. जर्मनीतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा ‘ऑनलाईन इव्हेंट’ ऐनवेळेला रद्द करण्यात आला. त्याचवेळी इटलीत एक कलाप्रदर्शन रद्द करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आल्याचे समोर आले आहे.

चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून युरोपात सेन्सॉरशिप लादण्याचे प्रयत्नजर्मन पत्रकार ऍड्रियन गायगस व स्टिफन ऑस्ट यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर एक पुस्तक लिहिले आहे. ‘शी जिनपिंग-द मोस्ट पॉवरफुल मॅन इन द वर्ल्ड’ असे या पुस्तकाचे नाव आहे. २७ ऑक्टोबरला या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. या सोहळ्यानिमित्त जर्मनीतील दोन विद्यापीठांमधील ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूटस्’नी ‘ऑनलाईन इव्हेंट’ आयोजित केला होता.

ड्युसेलडॉर्फमधील चीनचे कॉन्सल जनरल फेंग हैयांग यांनी हस्तक्षेप करून हा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले. यासंदर्भात ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’च्या एका कर्मचार्‍याने जिनपिंग यांच्याबाबत सामान्य व्यक्तीप्रमाणे बोलता येणार नाही, असे सांगण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जर्मन माध्यमे तसेच शिक्षणक्षेत्रात यावर प्रतिक्रिया उमटत असून, सरकार तसेच शिक्षणसंस्थांनी चीनबाबत ठाम भूमिका घेण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे.

जर्मनीतील सोहळा रद्द होत असतानाच इटलीतील प्रशासनाने ठाम भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. इटलीतील ब्रेसिआ शहरात, चीनमधील मानवाधिकार कार्यकर्ते बदिउकाओ यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चीनमधील कोरोनाचा उद्रेक, हॉंगकॉंग तसेच झिंजिआंग हे कलाकृतींचे विषय आहेत. रोममधील चिनी दूतावासाने ब्रेसिआतील प्रशासनाला सदर प्रदर्शन रद्द करण्याचे निर्देश दिले. मात्र स्थानिक प्रशासनाने ही विनंती धुडकावत प्रदर्शन रद्द होणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली.

leave a reply