अमेरिका युरोपला लष्करी व आर्थिकदृष्ट्या कमकुवत करीत आहे

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांचा आरोप

Russian Foreign Minister Lavrov meets with Organization of Islamic Cooperation Secretary General Tahaमॉस्को – अमेरिकेकडून युरोपला लष्करी तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. रशियाच नाही तर पाश्चिमात्य देशांमधील अर्थतज्ज्ञही याची जाणीव करून देत असल्याचे लॅव्हरोव्ह यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांनीही बायडेन प्रशासन जर्मनीचा प्रभाव संपविण्याच्या हालचाली करीत असल्याचा दावा केला होता.

‘क्युबन मिसाईल क्रायसिस’वरील माहितीपटाच्या निमित्ताने रशियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॅव्हरोव्ह यांनी युरोपला वास्तवाची जाणीव करून दिली. ‘युरोपियन उद्योगक्षेत्र खिळखिळे करणे व अर्थव्यवस्थेला हादरा देणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. केवळ रशियनच नाही तर पाश्चिमात्य देशांमधील अर्थतज्ज्ञही याकडे लक्ष वेधत आहेत. युरोपच्या संरक्षणदलांना कमकुवत करण्याचे प्रयत्नही अमेरिकेकडून सुरू आहेत. युरोपिय देशांना युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्यासाठी भाग पाडले जात आहे. त्याजागी युरोपिय देशांना अमेरिकी शस्त्रे पुरविली जात आहेत. पुढील काळात युरोपिय देशांची संरक्षणदले अमेरिकी शस्त्रांवर अवलंबून रहावीत हा यामागील उद्देश आहे’, असे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले.

Europe militarilyवैचारिकदृष्ट्या युरोपवर वर्चस्व प्रस्थापित करणे व आर्थिक पातळीवर असलेले स्वार्थी हितसंबंध यातून अमेरिका असे धोरण राबवित असल्याचेही लॅव्हरोव्ह यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी सध्या युरोपात ‘क्युबन मिसाईल क्रायसिस’शी साधर्म्य असणारी स्थिती निर्माण झाल्याचा दावाही केला. युक्रेन तसेच युरोपातील शस्त्रांमुळे रशियाला असे वाटत असल्याचेही परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह पुढे म्हणाले.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. मात्र या निर्बंधांचा सर्वाधिक फटका युरोपिय देशांनाच बसत असल्याचे गेल्या काही महिन्यांमधील आर्थिक आकडेवारीवरून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply