मोरबीमधील दुर्घटनेतील बळींची संख्या १३४वर

मोरबी – गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत बळींची संख्या १३४ वर पोहोचली असून यात ४५ मुलांचा समावेश आहे. यामध्ये एक ते दहा वर्षामधील ३४ मुले आहेत. तर या दुर्घटनेतील १७७ जणांना वाचविण्यात यश मिळाले आहे. तसेच १९ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी या प्रकरणी गुजरात पोलिसांनी गुन्हा नोंदवून ९ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये या पुलाची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या आणि इथले व्यवस्थापन हाताळणाऱ्या अजंटा-ओरेव्हा या कंपनीच्या चार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या भीषण दुर्घटनेवर देशभरासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Morbi tragedy१४० वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन मच्छू नदीवरील केबल ब्रिज रविवारी कोसळला होता. यावेळी या पुलावर चारशेहून अधिकजण उपस्थित होते. क्षमतेच्या कितीतरी अधिक भार एकाच वेळी या पूलावर आल्याने ही दुर्घटना घडल्याचा दावा केला जातो. सदर पुल कोसळतानाचे मोबाईल चित्रीकरणही समोर आले आहे. अवघ्या तेरा सेकंदात पुल कोसळला आणि पर्यटक खाली कोसळले. यातील काही जणांनी पुलाची केबल पकडून आपले प्राण वाचविले. तर काही जणांनी नदीमधील जलपर्णी पकडून आपले जीव वाचविले. मात्र पुलाच्या मध्यभागी असलेल्या बहुतांश जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मच्छू नदीच्या मध्यभागाची खोली १५ ते २० फूट इतकी असून नदीत मोठ्या प्रमाणावर गाळही असल्याने येथे बचावकार्य राबविणे मोठे आव्हान होते. लष्कर, वायुसेना आणि नौदलाने इथे बचावकार्य सुरू केले. तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) पाच आणि राज्याच्या आपत्ती निवारण दल एसडीआरएफची सहा पथके रात्रभर इथे बचावकार्य करीत होती. नदीतील गाळातून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे बचावकार्य अजूनही सुरू आहे.

देशभरात या दुर्घटनेचे पडसाद उमटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी उच्चस्तरिय बैठक आयोजित केली. तर गुजरातच्या राज्यसरकारने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. नेपाळ, श्रीलंका या शेजारी देशांनीही या दुर्घटनेवर शोकसंदेश पाठविला आहे.

दरम्यान, छट पूजेच्या निमित्ताने या पूलावर गर्दी झाली होती. त्यातच दिवाळीची सुट्टी असल्याने बरेचजण इथे गोळा झाले होते. यामुळे सदर दुर्घटनेची तीव्रता अधिकच वाढली आहे. या पुलाचे नुकतेच नुतनीकरण झाले होते. दुरुस्ती व नुतनीकरणाच्या कामासाठी हा पुल सात महिने बंद होता व गेल्या आठवड्यातच तो खुला करण्यात आला होता. मात्र येथील स्थानिक पालिकेने अद्याप या पुलाला फिटनेस सर्टिफिकेट दिले नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. असे असताना हा पुल खुला का करण्यात आला? याला कोण जबाबदार आहे? असे प्रश्न विचारले जात आहेत.

याशिवाय पुलावर जाण्यासाठी व्यवस्थापन हाताळणाऱ्या कंपनीकडून तिकीटांची विक्री केली जाते. पण पुलाच्या क्षमतेपेक्षा अधिकजणांना तिकिटांची विक्री का करण्यात आली. या पुलावरील गर्दी कमी करण्यासाठी का प्रयत्न झाले नाहीत? अनेक जण पुलावर सेल्फी काढण्यात व्यस्त होते. येथे सेल्फीला बंदी असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कुणालाही का रोखले नाही? अशा प्रश्नांची उत्तरेही अजून मिळालेली नाहीत.

तसेच कंपनीने पुलाची दुरुस्ती केली, त्यामध्ये हलक््या दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का? असाही सवाल केला जात आहे. या दुर्घटनेत बळी गेलेल्यांमध्ये कंपनीच्याही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. खासदार मोहन कुंदारिया यांच्या १२ नातेवाईकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

या भीषण दुर्घटनेनंतर १९७९ साली याच मच्छू नदीवरील धरण फुटून झालेल्या महाभीषण दुर्घटनेची आठवण अनेकांना झाली. या दुर्घटनेत हजारो जणांचा बळी गेला होता. त्यानंतर मच्छू नदीवरील ही दुसरी भीषण दुर्घटना ठरते.

leave a reply