‘वुहान लॅब थिअरी’बाबत फेसबुकच्या भूमिकेवर अमेरिकन व ब्रिटिश नेत्यांची टीका

वॉशिंग्टन/लंडन – कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाला, यासंदर्भातील पोस्ट फेसबुकवर प्रसिद्ध करता येतील, अशी नवी भूमिका फेसबुककडून जाहीर करण्यात आली आहे. फेसबुकने मारलेली ही पलटी त्यांची मग्रुरी दाखविणारी तसेच खरे व भयानक रुप उघड करणारी आहे, अशी घणाघाती टीका अमेरिका तसेच ब्रिटनमधील नेत्यांनी केली आहे. ब्रिटनमधील आघाडीचे दैनिक ‘डेलि मेल’ने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्तात फेसबुकबरोबरच अमेरिकेतील आघाडीच्या माध्यमांनी ‘लॅब लीक थिअरी’बाबत कशी कोलांटी मारली, याची माहिती दिली आहे.

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी अर्थात फेब्रुवारी महिन्यात फेसबुकने ‘लॅब लीक थिअरी’च्या मुद्यावर आक्रमक धोरण घेतले होते. कोरोनाव्हायरस मानवनिर्मित आहे, एखाद्या देशाने किंवा राजवटीने तयार केला आहे यासंदर्भातील पोस्ट वेबसाईटवरून काढून टाकण्यात येतील, असा इशारा फेसबुकने दिला होता. बुधवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना कोरोनाचे मूळ शोधण्याच्या प्रयत्नांना अधिक वेग द्यावा व त्यासंदर्भातील अहवाल 90 दिवसात सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यानंतर 24 तासांच्या आत फेसबुकने आधीच्या निर्णयावर पलटी खात ‘लॅब लीक थिअरी’संदर्भातील पोस्ट प्रसिद्ध करता येतील, असे जाहीर केले.

या निर्णयावर टीकास्त्र सोडताना ब्रिटनचे संसद सदस्य बॉब सीली यांनी, फेसबुकसारख्या बिग टेक कंपनीचे खरे आणि स्पष्टच सांगायचे झाले तर भयानक व ओंगळवाणे रंग जगासमोर आले, असे म्हटले आहे. लोकशाहीप्रती असलेल्या निष्ठेपेक्षा व्यावसायिक हितसंबंधच महत्त्वाचे असतात, हे फेसबुकच्या कृत्यावरून दिसून येते, असा दावाही सीली यांनी केला. लोकांचे म्हणणे सेन्सॉर करणे हे फेसबुकचे काम नाही, याची त्यांना जाणीव झाली असावी, अशी आशा आहे असा टोलाही ब्रिटीश सदस्यांनी यावेळी लगावला.

कोरोनाव्हायरसच्या बाबतीत फेसबुकने दाखवलेली मग्रुरी धक्कादायक होती, अशी नाराजी अमेरिकेचे संसद सदस्य जोश हॉली यांनी व्यक्त केली. ‘बिग टेककडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे चिरडले जात आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. मुळात फेसबुकने कोरोनासंदर्भातील पोस्टस्वर बंदी का घातली हा मुख्य प्रश्‍न आहे. त्याची उत्तरे मिळणे आवश्यक आहे’, अशा शब्दात अमेरिकी संसद सदस्य डायना हर्शबर्गर यांनी फेसबुकला धारेवर धरले.

ब्रिटनमधील सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते इयान डंकन स्मिथ यांनी, फेसबुकचा आधीचा निर्णय म्हणजे सोशल मीडिया कंपन्या सरकारी अधिकाराच्या मर्यादा कशा ओलांडू शकतात, याचे उदाहरण ठरते, अशा शब्दात तीव्र टीका केली. त्याचवेळी ही बाब खरी समस्या असल्याचीही जाणीव करून दिली. संसद सदस्य पीटर बोन यांनी यावेळी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांचा उल्लेखही केला. जर उदारमतवादी गटाने एखादी गोष्ट सांगितली ती बरोबर आणि ट्रम्प म्हणाले तर ती मूर्खपणाची ही भूमिका चुकीची आहे, असेही बोन यांनी यावेळी बजावले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, 2019 साली चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीचे मूळ वुहानमध्ये असल्याचा उल्लेख सर्वात आधी केला होता. आपल्या वक्तव्यांमधून त्यांनी सातत्याने ‘वुहान व्हायरस’चा उच्चार करीत कोरोनाच्या साथीमागे चीनच असल्याचे दावे केले होते. मात्र अमेरिकी माध्यमांनी ट्रम्प बेजबाबदार वक्तव्ये करीत असल्याचा ठपका ठेऊन जोरदार टीका केली होती.

leave a reply