चीनबरोबर युद्ध पेटण्याची शक्यता बळावलेली असताना बायडेन प्रशासनाने अमेरिकन जनतेला बेसावध ठेवले आहे

- विश्लेषक गॉर्डन चँग यांचा आरोप

बायडेनवॉशिंग्टन – बायडेन प्रशासनाच्या बेताल धोरणांमुळे अमेरिका आज रशिया आणि चीन या देशांबरोबर युद्धाच्या उंबरठ्यावर उभी आहे. बायडेन प्रशासनाला ही परिस्थिती अजिबात हाताळता आलेली नाही, अशी टीका अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी केली होती. चिनी वंशाचे अमेरिकी विश्लेषक गॉर्डन चँग यांनी किसिंजर यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. आक्रमक बनलेल्या चीनचे अमेरिकेबरोबर युद्ध पेटू शकते आणि असे असताना बायडेन यांच्या प्रशासनाने त्यासाठी अमेरिकन जनतेला अजिबात तयार केलेले नाही, अशी खरमरीत टीका गॉर्डन चँग यांनी केली आहे.

वर्षभरापूर्वी आपण तैवानचा ताबा घेतल्याची आवई चीनने उठविली होती. आक्रमणानंतर अवघ्या काही तासात तैवानने मान तुकविली व तैवान चीनच्या ताब्यात आल्याचे दावे या देशाने ठोकले होते. चीनच्या या प्रचारामागे अमेरिकेचे अफगाणिस्तानातील अपयश होते. ज्याप्रमाणे अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली, ते लक्षात घेता, अमेरिका तैवानचा ताबा घेण्यापासून चीनला रोखूच शकत नाही. त्यामुळे तैवानच्या बाबतीत आपल्याला हवे ते आपण करू शकतो, असे चीनला वाटत आहे, याकडे गॉर्डन चँग यांनी लक्ष वेधले.

इतकेच नाही तर अमेरिका व पाश्चिमात्यांच्या आघाडीवर असलेले तीव्र मतभेद पाहता, ही आघाडी आपल्यासमोर निष्फळ ठरेल आणि तैवानला वाचवू शकणार नाही, असा समज चीनने करून घेतलेला आहे, असे चँग यांनी बजावले आहे. पाश्चिमात्यांच्या आघाडीत असलेल्या मतभेदांमुळे, रशियाच्या हल्ल्यापासून अमेरिका युक्रेनचा बचाव करू शकली नाही. त्याच धर्तीवर तैवानलाही अमेरिका आपल्या हल्ल्यापासून वाचवू शकणार नाही, अशी चीनला वाटू लागले आहे. याने चीनचा बेतालपणा वाढत चालला आहे. तैवानवरील आक्रमणामागे चीनचा हा तर्क असू शकेल, असे चँग पुढे म्हणाले.

बायडेनकदाचित चीन तैवानवर सर्व शक्तीनिशी आक्रमण करणार नाही. हे आक्रमण मर्यादित स्वरूपाचेही असू शकेल. यामध्ये सागरी व हवाई क्षेत्रातील चीनच्या अतिशय घातक लष्करी हालचालींचा समावेश असेल. त्याचे विपरित परिणाम समोर आल्यावाचून राहणार नाही. कारण याने अपेक्षित नसलेल्या घटनांची न थांबवता येणारी मालिका सुरू होईल, असा इशारा गॉर्डन चँग यांनी दिला. अशा परिस्थितीत चीनबरोबर अमेरिकेचा संघर्ष पेट घेऊ शकतो. त्याची जाणीव अमेरिकन जनतेला करून देणे, ही बायडेन प्रशासनाची जबाबदारी ठरते. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन यासाठी पुढाकार घेत नाही, असे सांगून चँग यांनी प्रशासनावर टीका केली आहे.

बायडेन प्रशासन अमेरिकन जनतेला याची जाणीव करून देत नाही, ही चीनच्या पथ्यावर पडणारी बाब आहे. कारण अमेरिकन जनतेने बेसावध राहणे चीनच्या हिताचे आहे. यामुळे चीनला आपले आशियातील डावपेच अधिक प्रभावीपणे पुढे नेता येतील. या डावपेचांमध्ये आशिया खंडातील युद्धाचा समावेश आहे, अशा थेट शब्दात गॉर्डन चँग यांनी चीनच्या कारवायांमागील योजनांची जाणीव करून दिली आहे. चँग दावा करीत आहेत, त्यानुसार चीनच्या सरकारी माध्यमांनी देखील अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्यमाघारीकडे बोट दाखवून चीनच्या शेजारी देशांना धमकावले होते. काही झ्ााले तरी अमेरिका चीनपासून तुम्हाला वाचवू शकत नाही, हा धडा अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीतून घ्यायला हवा, असे चीनची माध्यमे छोट्या शेजारी देशांसह जपान व दक्षिण कोरियालाही धमकावत होती. तसेच युक्रेनच्या मुद्यावर अमेरिकेला रशियासमोर मिळत असलेल्या अपयशाकडे बोट दाखवून, चीन अमेरिकेच्या सहकार्याचे गंभीर परिणाम होतील, असे इशारे आपल्या शेजारी देशांना देत आहे.

यामुळे गॉर्डन चँग दावा करीत असलेल्या कारस्थानांवर चीन फार आधीपासून काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी बायडेन प्रशासन अजूनही चीनच्या या हालचालींची घ्यायला हवी त्या प्रमाणात दखल घेत नसल्याच्या निष्कर्षाला देखील गॉर्डन चँग यांच्या या दाव्यांमुळे अधिकच पुष्टी मिळत आहे.

leave a reply