अंदमान निकोबारच्या २१ बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे

परमवीर चक्रनवी दिल्ली – अंदमान व निकोबार द्विपसमुहातील सुमारे २१ बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत. पोर्ट ब्लेअर इथे पार पडलेल्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. याबरोबरच पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अंदमानमधील स्मारकाचे व्हर्च्युअल माध्यमातून उद्घाटन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंदमानमधील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते. अंदमान द्विपसमुहाचा भाग असलेल्या व आधीच्या काळात रॉस आयलंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटाचे नामकरण नेताजी सुभाषचंद्र बोस असे याआधीच करण्यात आले होते. नेताजींच्या १२६ व्या जयंतीचे निमित्त साधून या बेटावर त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. सोमवारी या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच अंदमान व निकोबार द्विपसमुहाचा भाग असलेल्या २१ बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे या समारोहात देण्यात आली आहेत. अशा स्वरुपाचा निर्णय घेणारा भारत हा जगातील पहिला देश ठरतो, असे सांगितले जाते.

या बेटांना आधीच्या काळात कुठलेही नाव देण्यात आलेले नव्हते व त्यावर देशाच्या पारतंत्र्याची छाप होती. पण आता या बेटांना परमवीर चक्र विजेत्यांचे नाव देण्यात आले असून या बेटांवरील गुलामीची छाप पुसून टाकण्यात आलेली आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. या नामकरणात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा संदेश असल्याचे पंतप्रधान पुढे म्हणाले. तसेच भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्य व पराक्रमाचा संदेशही यातून मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

दरम्यान, हिंदी महासागर क्षेत्रातील अंदमान व निकोबार द्विपसमुहावरील भारताचा ताबा देशाच्या सुरक्षा व सागरी हितसंबंधांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरतो. भारताला आव्हान देऊ पाहणारा चीन याकडे बारकाईने पाहत आहे. म्हणूनच या द्विपसमुहाचा भाग असलेल्या बेटांचा भारताने आपल्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावीपणे वापर करायला हवा, असे सामरिक विश्लेषक सांगत आहेत. अशा परिस्थितीत भारताने या द्विपसमुहाचा भाग असलेल्या २१ बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देऊन चीनसारख्या देशाला सज्जड इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply