शाळा सुरु होताच आंध्र प्रदेशात ५७५ विद्यार्थी, ८२९ शिक्षकांना कोरोना

हैदराबाद – देशातील अनेक राज्यात अनलॉकअंतर्गत नियम शिथिल करण्यास सुरुवात करण्यात आली असून काही राज्यांनी शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र आंध्र प्रदेशमध्ये शाळा सुरु करण्याच्या निर्णय चिंता वाढवणारा ठरला आहे २ नोव्हेंबरपासून आंध्र प्रदेशमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग सुरु करण्यात आले. मात्र तीन दिवसातच ५७५ विद्यार्थी आणि ८२९ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये टप्या टप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाअंतर्गत पहिल्या टप्यात नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी देण्यात आली होती. सुरुवातीला अर्धा दिवस शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अपेक्षेनुसार नव्हती. राज्यात नववी आणि दहावीचे सुमारे ९.७५ लाख विद्यार्थी आहेत, त्यापैकी ३.९३ लाख विद्यार्थी मागील तीन दिवसात शाळेत आले होते. तर एकूण १.११ लाख शिक्षकांपैकी ९९ हजारहून अधिक शिक्षक शाळेत आले .शाळेत येणाऱ्या ७० हजार ७९० शिक्षक आणि ९५ हजार ७६३ विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ५७५ विद्यार्थी आणि ८२९ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत संक्रमित विद्यार्थ्यांची संख्या चिंताजनक नाही. शाळा सुरू करण्यासाठी सर्व सुरक्षा मापदंडांचे पालन करण्यासाठी शक्य ती पाऊल उचलली जात असल्याचे शालेय शिक्षण आयुक्त व्ही. चिन्ना वीरभद्र म्हणाले. पश्चिम गोदावरी जिल्ह्यात सर्वाधिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या जिल्ह्यात ४१ हजार शिक्षकांपैकी २६२ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. विशाखापट्टणममध्ये ४५२७ शिक्षकांपैकी ५२ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.

leave a reply