इराणचे अणुप्रकल्प टिपण्याचा सराव करणाऱ्या इस्रायलच्या ‘चॅरिअट्स ऑफ फायर’ची घोषणा

जेरुसलेम – इराणने आपल्या अणुप्रकल्पांमध्ये 1000 सेंट्रिफ्युजेस इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये इराण अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक असलेले साहित्य मिळविल, असा इशारा इस्रायल देत आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गांत्झ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते या मुद्द्यावर बायडेन प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. पण अमेरिकेकडून फारशी अपेक्षा नसलेल्या इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. येत्या महिन्याअखेरीस इस्रायलने ‘चॅरिअट्स ऑफ फायर’ युद्धसरावाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्याचा सराव करणार आहे.

इस्रायलच्या आघाडीच्या दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, 29 मेपासून चॅरिअट्स ऑफ फायर युद्धसरावाची सुरुवात होईल. साधारण महिनाभर चालणारा हा सराव पूर्णपणे इराणचे अणुप्रकल्प आणि अतिसंवेदनशील ठिकाणांना लक्ष करण्यावर केंद्रित असेल. इस्रायलच्या संरक्षणदलाने इराणच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करण्यासाठी आयोजित केलेला आत्तापर्यंतचा हा पहिला असा युद्धसराव असेल. इस्रायलच्या उत्तर सीमाभागाकडून सुरू होणारा हा सराव भूमध्य समुद्रापर्यंत विस्तारणार आहे. इस्राइलच्या संरक्षणदलातील बहुतांश युनिट्स या सरावात सहभागी होणार असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या सरावाचे गांभीर्य वाढल्याचे इस्रायली दैनिकाचे म्हणणे आहे.

या सरावासाठी इस्रायलच्या हवाईदलाने विशेष तयारी केली आहे. इराणच्या भूमिगत अणुप्रकल्पांबरोबरच इस्रायलच्या हवाईदलाने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने इराणमधील हल्ल्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. एआयच्या मदतीने इराणमधील अशा टार्गेटेड ठिकाणांची संख्या 400 टक्क्यांनी वाढल्याचे इस्रायली वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरी जीवितहानी कमी करण्यात यश मिळेल, असा दावा इस्रायली लष्कर करीत आहे. त्यामुळे येत्या महिनाअखेरीस होणाऱ्या चॅरिअट्स ऑफ फायर युद्धसराव अतिशय महत्त्वाचा आणि वेगळा ठरतो, असे इस्रायली दैनिकाचे म्हणणे आहे.

इराणच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करणाऱ्या या सरावात अमेरिकेचे टँकर विमान, इस्रायली लढाऊ विमानांना इंधन पुरवण्याचे काम करणार आहे. त्याशिवाय या सरावात अमेरिकेचा सहभाग नसेल, असे संकेत मिळत आहेत. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना ही माहिती समोर येत आहे. संरक्षणमंत्री गांत्झ या दौऱ्यात अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन आणि परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा करतील. अमेरिकेने इराणबरोबरच्या अणुकरारापासून दूर रहावे, हा संदेश देण्यासाठी संरक्षणमंत्री गांत्झ अमेरिकेला गेल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

इस्रायलच्या लष्कराने इराणवर हल्ल्याची तयारी सुरू करावी, असा इशारा संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनी गेल्या वर्षीच दिला होता. इराणचे अणुप्रकल्प आणि लष्करी तळांवरील हल्ल्याची पूर्ण योजना तयार करावी, अशी सूचना कोशावी यांनी दिली होती. चॅरिअट्स ऑफ फायर युद्धसराव त्याचीच तयारी असल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. हा सराव आयोजित करून इस्रायल इराण तसेच अणुकरारासाठी धडपडणाऱ्या बायडेन प्रशासनाला इशारा देत असल्याचा दावा इस्रायलमधील काही विश्लेषक करीत आहेत.

leave a reply