बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली – शुक्रवारी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. बिहारमध्ये २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात तीन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल, तर १० नोव्हेंबरला निकाल घोषित होतील.

बिहार विधानसभा

कोरोनाच्या संकटामुळे बिहार निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती काही पक्षांतर्फे करण्यात आली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल, याबाबत ग्वाही देताना सर्व परिस्थिती लक्षात घेऊन निवडणूक कार्यक्रमाची आखणी करण्यात आल्याचे सुनील अरोरा म्हणाले. तसेच निवडणूक आयोग या निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी २८ ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील ३ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१ जागांवर दुसऱ्या टप्प्यात ९४ जागांवर अंतिम टप्प्यात ७८ जागांवर मतदान होईल. बिहारमध्ये एकुण मतदार सात कोटी २९ लाख असून ४२ हजार पोलिंग बूथ वर मतदान पार पडेल. मतदानासाठी एक लाख ७३ हजार वोटिंग मशीनचा वापर केला जाईल.

कोरोनाचे संकट पाहता निवडणूक आयोगाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार मतदानाची वेळ एका तासाने वाढवण्यात आली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहाच्या दरम्यान मतदान होईल. तसेच एका मतदान केंद्रावर १५०० च्या जागी हजार मतदार येतील. कोरोनचे रुग्ण शेवटच्या एका तासात मतदान करू शकतील. बिहार निवडणुकीत ४६ लाख मास्क ७.६ लाख फेस शील्ड २३ लाख हॅण्डग्लोज आणि सहा लाख पीपीई किटचा वापर होणार आहे.

leave a reply