संयुक्त अरब अमिरातीकडून पाकिस्तानला आणखी एक धक्का

संयुक्त अरब अमिरातइस्लामाबाद – ‘संयुक्त अरब अमिराती’ने (युएई) पाकिस्तानला दुसरा धक्का दिला आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्यात आपले पाच राजनैतिक अधिकारी गमावणाऱ्या ‘युएई’ने या हल्ल्यामागे पाकिस्तानची ‘आयएसआय’ असल्याचे संकेत दिले होते. आता पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाकारुन ‘युएई’ने या देशाला आणखी एक धक्का दिल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने आपल्या परराष्ट्र धोरणात बदल करून तुर्की आणि इराणला झुकते माप दिल्यामुळे सौदी अरेबिया व ‘युएई’ पाकिस्तानला अद्दल घडविण्याची तयारी करीत आहेत. ‘युएई’ने घेतलेले निर्णय हा त्याचाच भाग ठरतो.

गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये इम्रान खान सरकारवर टीका होत आहे. सौदी अरेबिया पाठोपाठ ‘युएई’ने देखील पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाकारल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी यावर दिलेल्या निवेदनात ‘युएई’ने पाकिस्तान तसेच आणखी 11 देशांना व्हिसा नाकाराल्याचे सांगितले. कोरोनाव्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई केल्याचे सांगून पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने आपला बचाव केला आहे. पण पाकिस्तानी पत्रकार व विश्‍लेषक ‘युएई’च्या या कारवाईवर गंभीर चिंता व्यक्त करीत आहेत.

संयुक्त अरब अमिरात

2017 साली अफगाणिस्तानच्या कंदहार येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ‘युएई’च्या पाच राजनैतिक अधिकाऱ्यांचा बळी गेला होता. या घातपाताला पाकिस्तानस्थित ‘हक्कानी नेटवर्क’ ही दहशतवादी संघटना जबाबदार असल्याची माहिती समोर येत आहे. हक्कानी नेटवर्क ही दहशतवादी संघटना पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ची हस्तक असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हत्येमागे ‘आयएसआय’ असल्याचे संकेत ‘युएई’ने दिले आहेत.

त्याचबरोबर ‘युएई’च्या विरोधात गरळ ओकणाऱ्या इम्रान खान यांच्या काही समर्थकांना आपल्या हवाली करण्याची मागणी ‘युएई’ने पाकिस्तानकडे केल्याची माहिती समोर येत आहे. ‘युएई’च्या या भूमिकेमुळे पाकिस्तानी विश्‍लेषक हवालदिल झाले आहेत. सौदी अरेबिया व आत्ता ‘युएई’ या दोन्ही अरब देशांनी एका पाठोपाठ एक पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याची सुरूवात केली आहे. ही बाब पाकिस्तानसाठी घातक ठरेल, असा इशारा हे विश्‍लेषक देत आहेत.

सौदी अरेबिया, युएई सारख्या अरब आखाती देशांकडून आर्थिक तसेच राजकीय सहाय्य घेऊन पाकिस्तानने आत्तापर्यंत आपल्यावरील संकटांचा सामना केला. पण इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर आल्यानंतर, त्यांनी परराष्ट्र धोरणात बदल करून तुर्की व इराणला झुकते माप दिले. सौदी व युएईसारख्या पाकिस्तानला आजवर सहाय्य करीत आलेल्या देशांकडून यावर प्रतिक्रिया उमटू शकते, ही बाब इम्रान खान यांनी लक्षात घेतली नाही.

याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहेत आणि पुढच्या काळात यात अधिकच वाढ हेोईल, असा इशारा पाकिस्तानातील अनुभवी पत्रकार व विश्‍लेषक देत आहेत.

leave a reply