जम्मू-कश्‍मीरमध्ये पंचायत निवडणुकांच्या आधी हल्ल्याचा मोठा कट उधळला

-‘जैश’चे चार दहशतवादी ठार, 11 एके-47 रायफलींसह मोठा स्फोटकांचा साठा जप्

पंचायतश्रीनगर – जम्मू-कश्‍मीरमध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुकीपूर्वी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या चार दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी नागरोटामध्ये ठार केले. दहशतवादी ज्या ट्रकमधून लपून आले होते तो ट्रकच सुरक्षादलांनी उडवून दिला. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा होता. 11 एके-47 रायफली, 29 हॅण्ड ग्रेनेड, तीन पिस्तूलांसह इतर शस्त्रसाठा घटनास्थळी आढळून आला आहे. यामुळे मोठा हल्ल्याचा कट उधळला गेल्याचे स्पष्ट होते.

जम्मू-कश्‍मीरच्या नागरोटा येथील राष्ट्रीय महामार्ग 44 वरील टोल प्लाझावर तपासणी सुरू असताना दहशतवाद्यांबरोबर ही चकमक उडाली. दहशतवादी जम्मू-काश्‍मीरमध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुका उधळण्याचा कट आखत असून यासाठी काही दहशतवादी मोठा शस्त्रसाठा घेऊन जम्मूच्या दिशेने जात असल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. यानंतर महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. नागरोटा येथील टोल प्लाझाजवळही नाकाबंदी करण्यात आली होती.

पंचायत

येथे पहाटे पाचच्या सुमारास आलेल्या एका ट्रकलाही तपासणीसाठी अडविण्यात आले. मात्र या ट्रकच्या पाठीमागील बाजूस लादलेल्या गोण्यांच्या आड लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबारास सुरुवात केली. याला येथे तैनात पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांकडून गोळीबारासह ग्रेनेडही फेकण्यात आले. मात्र अतिरिक्त कुमक दाखल होईपर्यंत येथे तैनात जवानांनी दहशतवाद्यांना पळून जाण्याची कोणतीही संधी दिली नाही. अत्याधुनिक शस्त्रे असूनही दहशतवादी सुरक्षादलांच्या जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरापुढे हतप्रभ झाले.

पंचायततीन तास ही चकमक सुरू होती. या काळात जम्मू-काश्‍मीर महामार्ग बंद करण्यात आला होता. अखेर सुरक्षादलांनी हा ट्रकच उडवून दिला. यामध्ये चारही दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’चे असल्याची माहिती जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी दिली. तसेच या ट्रकचा चालक गायब असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरोटा येथील टोल प्लाझाजवळ फेब्रुवारी महिन्यातही अशाच प्रकारे चकमक उडाली होती. यावेळी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते आणि मोठा शस्त्र व स्फोटक साठा जप्त करण्यात आला होता. 2016 साली उरी नंतर नागरोटामधीलच भारतीय लष्कराच्या तळाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. यामध्ये सात जवान शहीद झाले होते.

दरम्यान, अलीकडच्या काळात जम्मू-कश्‍मीरमध्ये कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला हा मोठा शस्त्रसाठा आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये हिंसाचार माजविण्याचा पाकिस्तानी दहशतवादी संघटना आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र सुरक्षादलांच्या जोरदार कारवाईमुळे हे सारे प्रयत्न उधळले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना अधिक अस्वस्थ बनल्या आहेत. याच निराशेतून गेल्यावर्षी काशीरामधून कलम 370 हटविल्यानंतर होणाऱ्या या पंचायत निवडणुका उधळण्याचा प्रयत्न दहशतवादी करीत असल्याचे दावे केले जात आहेत.

leave a reply