कोरोनावरील आणखी एक स्वदेशी लस झायडस कॅडिलाच्या ‘जॉयकोव्ह-डी’ला लसीला डीसीजीआयची मंजुरी

- 12 वर्षांवरील मुलांनाही देता येणार; जगातील पहिली डीएनए आधारीत कोरोना लस

नवी दिल्ली – झायडस कॅडिला या अहमदाबादस्थित कंपनीने विकसित केलेल्या ‘जॉयकोव्ह-डी’ या लसीला ‘द ड्रग्ज्‌ कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) वापरासाठी मंजुरी दिली आहे. जगातील ही पहिली डीएनए आधारीत कोरोना लस असून 12 वर्षांवरील मुलांनाही ही लस देता येईल. त्यामुळे देशात 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग खुला झाला आहे. ‘जॉयकोव्ह-डी’ ही लस तीन डोस घ्यावे लागणार आहेत. तीन डोस असलेली ही पहिलीच लस आहे.

कोरोनावरील आणखी एक स्वदेशी लस झायडस कॅडिलाच्या ‘जॉयकोव्ह-डी’ला लसीला डीसीजीआयची मंजुरी - 12 वर्षांवरील मुलांनाही देता येणार‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांनी ‘जॉयकोव्ह-डी’ या लसीला मान्यता देण्यात यावी अशी शिफारस ‘डीसीजीआय’ला केली होती. त्यानंतर ‘डीसीजीआय’ लगेचच या लसीला मान्यता दिली. जुलै महिन्यात झायडस कॅडिलाकडून लसीला आपत्कालीन मंजुरी मिळावी यासाठी ‘डीसीजीआय’कडे अर्ज केला होता. याआधी या लसीच्या देशभरात चाचण्या पार पडल्या होत्या. देशातील 50 हून अधिक केंद्रावर या लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या पार पडल्या. यातून ही लस खूप प्रभावी असल्याचे लक्षात आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑगस्ट अखेरीपर्यंत झायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी मिळू शकते व मुलांसाठी देशात कोरोनावरील पहिली लस उपलब्ध होऊ शकते, असे संकेत दिले होते.

झायडस कॅडिलाची ही लस डीएनए बेस असून अशा तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेली ही जगातील पहिलीच कोरोनावरील लस ठरली आहे. कोरोना संसर्गापासून बचावाबरोबर संसर्ग झाल्यास त्यातून लवकर आराम पडावा यादृष्टीने ही लस विकसित करण्यात आली आहे. पण या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. झायडस कॅडिलाकडे वर्षाला 10 ते 12 कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे.

झायडस कॅडिलाच्या लसीला मिळालेल्या मंजुरीनंतर देशात आता कोरोनावरील सहा लसी उपलब्ध झाल्या आहेत. याआधी सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनद्वारे भारतात सरकारकडून लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जात असून इतर लसी या खाजगी रुग्णालयात उपलब्ध आहेत. लवकरच आता जॉयकोव्ह-डी ही लसही लसीकरणासाठी उपलब्ध होईल.

12 वर्षांवरील मुलांना ही लस देता येणार असल्याने जॉयकोव्ह-डीद्वारे मुलांचे लसीकरण सुरू करता येईल. तसेच सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांवर सुरु असलेल्या चाचण्या पूर्ण होऊन या लसीलाही मुलांच्या लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. कोव्हॅक्सिन लस दोन वर्षाच्या मुलांपासून ते 18 वर्षांच्या मुलांसाठी उपलब्ध होईल. कोरोनाची तिसरी लाट आल्यास मुले पहिल्या दोन लाटेपेक्षा अधिक प्रमाणात संक्रमित होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येते. त्यामुळे जॉयकोव्ह-डी मिळालेली मंजुरी अतिशय महत्त्वाची ठरते.

दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्यासाठी केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली आहे. सरकार प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यास वचनबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले.

leave a reply