दहशतीच्या पायावर उभे राहणारे साम्राज्य फार काळ टिकत नाही

- भारताच्या पंतप्रधानांचा तालिबानला इशारा

नवी दिल्ली – ‘दहशतीच्या पायावर आपले साम्राज्य उभे करू पाहणाऱ्या शक्ती काही काळासाठी वरचढ ठरतीलही. पण या विध्वंसक शक्ती फार काळ मानवतेला दडपून ठेवू शकत नाहीत. दहशतीचा वापर करून श्रद्धा चिरडता येऊ शकत नाही. वारंवार विध्वंस होऊनही तितक्याच वेळा पुन्हा उभे राहिलेले भगवान सोमनाथाचे मंदिर भारतासह जगाला हाच विश्‍वास आणि आश्‍वासन देत आहे’, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. अफगाणिस्तानात तालिबानची दहशतवादी राजवट प्रस्थापित होत असताना पंतप्रधानांनी हा संदेश देऊन भारताची तालिबानबाबतची भूमिका नेमक्या शब्दात मांडल्याचे दिसत आहे.

दहशतीच्या पायावर उभे राहणारे साम्राज्य फार काळ टिकत नाही - भारताच्या पंतप्रधानांचा तालिबानला इशारागुजरातमधील सोमनाथ मंदिर व या मंदिराशी निगडीत इतर प्रकल्पांचे व्हर्च्युअल माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिराच्या इतिहासाचा दाखला दिला. ‘हल्लेखोरांनी वारंवार विध्वंस करूनही हे मंदिर पुन्हा उभे राहिले. दहशतीच्या पायावर उभे राहिलेले साम्राज्य फार काळ टिकू शकत नाही. काही हल्लेखोर सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करताना हे सत्य होते आणि आजच्या काळात अशा मानसिकतेची धास्ती जगाला असतानाही तितकेच सत्य आहे’, असे लक्षवेधी उद्गार पंतप्रधानांनी काढले. अफगाणिस्तानमध्ये दहशतीच्या बळावर राजवट प्रस्थापित करण्याच्या तयारीत असेलल्या तालिबानला पंतप्रधान मोदी यांनी हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेण्यासाठी लष्करी मुसंडी मारली. मात्र तसे करीत असताना, आपल्यापासून शेजारी देशांना, विशेषतः भारताला धोका नसल्याचे तालिबानचे नेते सातत्याने सांगत होते. पण आता तालिबानचा क्रूर, दहशतवादी चेहरा जगासमोर येऊ लागला आहे. आपल्याला विरोध करणाऱ्या निःशस्त्र अफगाणी जनतेवर तालिबानचे दहशतवादी बेछूट गोळीबार करीत आहेत. याबरोबरच भारताने अफगाणिस्तानातील दूतावास व विकासप्रकल्प सुरू ठेवणाऱ्या तालिबानची भारतविरोधी मानसिकताही स्पष्ट होऊ लागली आहे.

हेरात तसेच कंदहार येथील भारताच्या दूतावासात तालिबानचे दहशतवादी शिरले आणि त्यांनी इथली काही कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच दूतावासाच्या गाड्या घेऊन हे तालिबानी निघून गेल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी काबुलमधील दूतावासाबाहेर तालिबानच्या दहशतवाद्यांनी गराडा घातल्याच्याही बातम्या येत आहेत. याच्या बरोबरीने भारताने आपले अफगाणिस्तानातील दूतावास बंद करू नये, असे आवाहन तालिबानकडून केले जात आहे. भारतीय राजनैतिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्याकडून धोका नसल्याचे आश्‍वासन देखील तालिबानने दिले आहे. पण भारत त्यावर विश्‍वास ठेवायला तयार नाही.

रशिया व चीनप्रमाणे भारताने देखील आपला अफगाणिस्तानवरील कब्जा मान्य करावा व त्याला अधिकृतता द्यावी, यासाठी तालिबानची धडपड सुरू आहे. मात्र भारत, युरोपिय देश तसेच जपानने देखील तालिबानवर विश्‍वास ठेवता येणार नसल्याचे संकेत दिले आहे. अजूनही अफगाणिस्तानात आपले अधिकारी व नागरिक अडकलेले असल्याने बरेचसे देश तालिबानच्या विरोधात उघडपणे भूमिका स्वीकारायला तयार नाहीत. पण तालिबानने दहशतीच्या बळावर राज्य करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला मान्यता दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश लोकशाहीवादी देशांकडून दिला जात आहे.

भारताच्या पंतप्रधानांनीही नेमक्या शब्दात तालिबानला हा इशारा दिला. दहशतीच्या बळावर स्थापन झालेली राजवट फार काळ टिकणार नाही, हा पंतप्रधानांनी दिलेला इशारा तालिबानसह तालिबानच्या मागे उभ्या असलेला पाकिस्तान आणि चीनसारख्या मतलबी देशांना लागू पडत आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी देखील सुरक्षा परिषदेच्या बैठकीत दहशतवादाच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारल्याखेरीज पर्याय नाही, असे बजावले होते. दहशतवाद्यांचा ‘पाहुणचार’ करून त्यांना उत्तेजन देणाऱ्या देशांचा पर्दाफाश करताना, कच खाऊन चालणार नाही, असे आवाहन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेत केले.

ही कठोर भूमिका स्वीकारून भारताने तालिबानला सज्जड इशारा दिल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या विरोधात जनमत तयार झाले असून भारताने स्वीकारलेली ही ठाम भूमिका अफगाणी जनतेचे मनोबल अधिकच दृढ करणारी ठरू शकेल.

leave a reply