ड्रोनच्या घुसखोरीमागे इराण असल्याचा आरोप करून सिरियात इस्रायलचा आणखी एक हवाई हल्ला

- इराणकडून प्रत्युत्तराचा इशारा

जेरूसलेम/तेहरान – इस्रायल आणि इराणमधील छुपे युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. सिरियातून इस्रायलमध्ये घुसखोरी करणारा ड्रोन इराणचा होता, असा आरोप इस्रायलच्या लष्कराने केला. यानंतर अवघ्या काही तासात सिरियाची राजधानी दमास्कसमधील इराणच्या प्रयोगशाळेवर जोरदार हवाई हल्ले झाले. यामध्ये दोन नागरिकांचा बळी गेल्याचा दावा सिरियन यंत्रणा करीत आहेत. गेल्या सहा दिवसात इस्रायलने सिरियात चढविलेला हा चौथा हल्ला ठरतो.

ड्रोनच्या घुसखोरीमागे इराण असल्याचा आरोप करून सिरियात इस्रायलचा आणखी एक हवाई हल्ला - इराणकडून प्रत्युत्तराचा इशारादोन दिवसांपूर्वी, रविवारी इस्रायलने सिरियात चढविलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचा वरिष्ठ कमांडर ठार झाला होता. सिरियातील हल्ल्यात आपला कमांडर मारला गेल्याची घोषणा इराणने केली होती. पुढच्या काही तासात सिरियाच्या गोलान सीमेतून इस्रायलच्या हद्दीत ड्रोनने घुसखोरी केली होती. इस्रायलच्या हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमानांनी सदर टेहळणी ड्रोन पाडले. यानंतर इस्रायलच्या लष्कराने सदर ड्रोनच्या सुट्या भागाची पाहणी केल्यानंतर ते इराणी बनावटीचे असल्याचे उघड झाले. इस्रायलच्या लष्कराने सोमवारी ही माहिती जाहीर केली.

सोमवारी मध्यरात्रीनंतर सिरियाची राजधानी दमास्कस पुन्हा एकदा हवाई हल्ल्यांनी हादरली. दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या ‘अल-किसवाह’ भागातील इराणच्या प्रयोगशाळेवर इस्रायलची क्षेपणास्त्रे आदळली, अशी माहिती ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने दिली. या हल्ल्यात दोन नागरिकांचा बळी गेल्याचा दावा सिरियन लष्कराने केला. पण या स्फोटाची तीव्रता मोठी होती. याचे आवाज कासियोन पर्वताचे क्षेत्र आणि अल-सैदा झैनाब भागातही ऐकू आले. त्यामुळे अल-किसवाह येथील हल्ल्यात वित्तहानीबरोबरच मोठी जीवितहानी झाली असून सिरियन सरकार माहिती दडवत असल्याचा संशय मानवाधिकार संघटना व्यक्त करीत आहेत.

ड्रोनच्या घुसखोरीमागे इराण असल्याचा आरोप करून सिरियात इस्रायलचा आणखी एक हवाई हल्ला - इराणकडून प्रत्युत्तराचा इशाराइस्रायलने गेल्या सहा दिवसात आपल्या देशात चढविलेला हा चौथा हल्ला असल्याचा आरोप सिरियन लष्कर करीत आहे. सिरियातील इराण व हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करून हे सर्व हल्ले चढविण्यात आले होते. इस्रायलने यापैकी कोणत्याही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या देशांना आम्ही याची मोठी किंमत चुकती करण्यास भाग पाडत आहोत, असे सूचक उद्गार यावेळी पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी काढले होते. तर आपले दोन मोठे कमांडर गमाविणाऱ्या इराणने सिरियातील हल्ल्यांवर संताप व्यक्त केला.

सिरियातील हल्ल्यांमध्ये आपले जवान आणि हितसंबंधांना लक्ष्य केले जात असल्याची टीका संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजदूत अमीर सईद इरावानी यांनी केली. तसेच या हल्ल्यांपासून सिरियातील आपल्या हितसंबंधांची सुरक्षा करणार असल्याचे इरावानी यांनी राष्ट्रसंघाचे महासचिव अँतोनियो गुतेरस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर इराणवरील या हल्ल्यांना योग्य ते प्रत्युत्तर देण्याचा इशारा इराणच्या राजदूतांनी दिला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराणमध्ये नव्याने छुपे युद्ध सुरू झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. गेल्याच आठवड्यात ग्रीसमध्ये इस्रायलचे सांस्कृतिक केंद्र व अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्याचा मोठा कट उधळण्यात आला होता. इराणने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या साथीने हा कट आखल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यानंतर सिरियातील इराणच्या ठिकाणांवरील हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

हिंदी English

 

leave a reply