चीनच्या चिथावणीखोर कारवायांना उत्तर देण्यासाठी अमेरिकेचे आणखी एक शिष्टमंडळ तैवानमध्ये दाखल

शिष्टमंडळतैपेई – रविवारी चीनच्या लढाऊ विमानांनी आणि विनाशिकांनी पुन्हा आपल्या मध्यरेषेजवळ धडक मारली, असा आरोप तैवानने केला. याला काही तास उलटत नाही तोच, अमेरिकेच्या इंडियाना प्रांताचे गव्हर्नर एरिक होल्कॉम्ब मोठ्या शिष्टमंडळासह तैवानमध्ये दाखल झाले. अमेरिकन सभापती नॅन्सी पेलोसी, वरिष्ठ सिनेटर एड मार्की यांच्यानंतर गव्हर्नर होल्कॉम्ब तैवानला भेट देणारे तिसरे नेते ठरले आहेत.

तैवानमधील लोकशाहीसमर्थक आणि विघटनवाद्यांना सहाय्य केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी चीन सातत्याने देत आहे. पण या धमक्यांकडे दुर्लक्ष करून अमेरिकी लोकप्रतिनिधी तैवानला भेट देऊन चीनच्या चिथावणीखोर कारवायांना उत्तर देत आहेत. पिपल्स लिबरेशन आर्मीची 12 लढाऊ विमाने आणि चार विनाशिकांनी रविवारी दुपारी तैवानच्या भोवती गस्त घातली. यापैकी पाच लढाऊ विमाने तैवानच्या मध्यरेषेजवळ पोहोचली होती. याद्वारे चीनच्या विमानांनी तैवानच्या ‘एक्स्लुझिव्ह इकोनॉमिक झोन’च्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा दावा केला जातो. तैवानच्या आखाताजवळील चीनच्या या कारवाया तैवानमधील लोकशाहीवादी सरकार व जनतेवरील दबाव वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे आरोप स्थानिक माध्यमातून होत आहेत. तैवान देखील लढाऊ विमानांना रवाना करून आणि तोफांचा लाईव्ह फायर सराव आयोजित करून चीनच्या आक्रमकतेला उत्तर देत आहे.

अशा परिस्थितीत, अमेरिकेकडूनही चीनच्या चिथावणीला उत्तर दिले जात आहे. अमेरिकेचे लोकप्रतिनिधी तैवानला भेटी देत आहेत. इंडियाना प्रांताचे गव्हर्नर एरिक होल्कॉम्ब आपल्या आर्थिक सल्लागारांच्या शिष्टमंडळासह सोमवारी तैवानमध्ये दाखल झाले. गेल्या महिन्याभरात अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी तैवानला भेट देण्याची ही तिसरी भेट ठरते. याआधी अमेरिकन सभापती नॅन्सी पेलोसी यांची तैवान भेट ही चीनसाठी आव्हान ठरली होती. पेलोसी यांचे विमान पाडण्याची धमकी देणारा चीन कारवाई करू शकत नसल्याचे उघड झाले होते.

चीनने पेलोसी यांच्यावर निर्बंध लादून आपली आक्रमकता दाखविण्याचा प्रयत्न केला. पण आठवड्याभरापूर्वी अमेरिकन सिनेटच्या वरिष्ठ सिनेटर्सनी मोठ्या संख्येने तैवानला भेट दिली. यानंतर चीन अमेरिकेला धमकावण्याशिवाय काहीही करू शकलेला नाही. त्यातच आत्ता इंडियानाच्या गव्हर्नरनी तैवान गाठल्यामुळे चीनसमोरील आव्हान वाढले आहे. गव्हर्नर होल्कॉम्ब हे इंडियानामध्ये सेमीकंडक्टर्सचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असून त्यासाठी ते तैपेईत दाखल झाल्याचा दावा केला जातो.

तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी गव्हर्नर होल्कॉम्ब यांची भेट घेतली. तसेच ‘आर्थिक सुरक्षा ही राष्ट्रीय आणि क्षेत्रीय सुरक्षेचा महत्त्वाचा स्तंभ आहे. या पार्श्वभूमीवर, तैवानला देखील सेमीकंडक्टर्सची पुरवठा साखळी उभारण्यासाठी लोकशाहीवादी देशांबरोबरील सहकार्य अधिक भक्कम करायचे आहे’, अशी घोषणा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी केली. तसेच तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘डेमॉक्रसी चिप्स’ असा उल्लेख करून सेमीकंडक्टर्सच्या पुरवठ्याला चीनपासून असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधले.

leave a reply