रशियाच्या ‘एफएसबी’ने भारतात आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला

कट उधळलामॉस्को – रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस-एफएसबी’ने भारतात घातपाताचा कट उधळला. आयएस या दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती हल्लेखोराला ‘एफएसबी’ने ताब्यात घेतले. आपण भारतात जाऊन आत्मघाती हल्ला करणार होतो, अशी कबुली या दहशतवाद्याने दिली. तसेच आपले ेनिंग तुर्कीमध्ये झाल्याची माहिती या दहशतवाद्याने उघड केली. भारताचे नेते आपल्या निशाण्यावर होते आणि भारतात गेल्यानंतर आपल्याला आत्मघाती हल्ल्यासाठी आवश्यक असलेले साहित्य पुरविले जाणार होते, अशी महत्त्वाची माहिती या दहशतवाद्याकडून मिळालेली आहे.

या दहशतवाद्याला कधी ताब्यात घेतले, याची माहिती एफएसबीने दिलेली नाही. पण सोमवारी या दहशतवाद्याच्या अटकेची माहिती व त्याच्या कबुलीजबाबाचा व्हिडिओ एफएसबीच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केला. हा दहशतवादी मध्य आशियाई देशाचा रहिवासी आहे. मात्र सोशल मीडियावरून त्याचे माथे भडकविण्यात आले होते. तो आत्मघाती हल्ल्यासाठी तयार झाल्यानंतर, तुर्कीच्या इस्तंबूल शहरामध्ये त्याची आयएसच्या नेत्याशी त्याची भेट घडविण्यात आली. इथे त्याला तुर्की सोडून रशियात जाण्याची सूचना करण्यात आले, असे एफएसबीने म्हटले आहे.

एप्रिल ते जून 2022 या काळात हा दहशतवादी तुर्कीमध्ये होता. त्यानंतर तो रशियात आला. इथेच त्याला भारतात दाखल होण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुरविली जाणार होती. भारतात प्रवेश करून सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची हत्या घडविण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले होते. याबाबतचे सारे तपशील रशियाच्या ‘एफएसबी’ने उघड केलेले नाहीत. पण या दहशतवाद्याच्या अटकेमुळे भयंकर कट उघडकीस आला आहे. आयएस ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असून जगभरात कुठेही घातपात घडविण्याची क्षमता आयएसने दाखवून दिले आहे. सुरूवातीच्या काळात इराक व सिरियामध्ये कारवाई करणाऱ्या आयएसने युरोपात घातपात घडविले होते.

आपल्या कट्टरवादी व विषारी अपप्रचाराच्या बळावर ही दहशतवादी संघटना जगभरात ‘लोन वुल्फ’ अर्थात एकांडे दहशतवादी तयार करते. त्यामुळे त्यांचा माग काढणे प्रगत देशांच्या गुप्तचर संघटनांनाही अवघड बनत असल्याचे दावे केले जातात. भारताने आयएसवर बंदी घातलेली आहे. तरीही इंटरनेट व सोशल मीडियाचा गैरवापर करून ही दहशतवादी संघटना भारतीय तरुणांमध्ये कट्टरवाद पसरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत असल्याचे उघड झाले होते. मात्र याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत ‘आयएस’ने भारताच्या विरोधात आखलेला हा भयंकर कट सुरक्षा यंत्रणांना सावध करणारा ठरतो.

leave a reply