‘कोव्हॅक्सिन’च्या तिसर्‍या ‘बूस्टर डोस’करिता क्लिनिकल ट्रायलला मंजुरी

‘बूस्टर डोस’नवी दिल्ली – ‘भारत बायोटेक’ आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) मिळून विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’चा तिसरा ‘बूस्टर डोस’ देण्यासंदर्भात विचार होत आहे. सध्या या लसीचे २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस देण्यात येतात. कोरोनाव्हायरसच्या म्युटेशन स्ट्रेनपासून बचावासाठी तिसरा डोस देण्याचा आणि भविष्यात या व्हायरसचे म्युटेशन थांबविण्याचा यामागे उद्देश आहे. यासाठी सहा महिन्याने या लसीचा ‘बूस्टर डोस’ देता येईल हे तपासण्यात येत असून यासंदर्भात क्लिनिकल ट्रायलला तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली आहे.

कोरोनाच्या विषाणूमध्ये बदल होत या विषाणूचे नवे स्ट्रेन सतत जन्माला येत आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करील अशी रोगप्रतिकारशक्ती तिसरा डोस देऊन निर्माण होईल का? याची तपासणी या ‘बूस्टर डोस’च्या चाचणीतून होणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’ क्रिनिकल ट्रायल चालू असताना सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ज्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली. त्यांना आता हा ‘बूस्टर डोस’ देण्यात येणार आहे.

भारत बायोटेकने यासंदर्भात ‘कोव्हॅक्सिन’ तिसरा डोस देण्यासंदर्भात आरोग्य मंत्रालयासमोर प्रस्ताव ठेवला होता. हा तिसरा डोस घेतल्यावर रोगप्रतिकारक शक्ती काही वर्ष वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे कोरोनाची साथ पुन्हा डोके वर काढणार नाही. त्याचे नवे स्ट्रेन जन्माला येणार नाही अशी आशा व्यक्त केली जाते. हे या चाचण्यांमधून तपासण्यात येईल. तसेच याचे साईड इफेक्टही तपासले जातील.

leave a reply