अरब नेते व सिरियामधील जवळीक वाढली

इजिप्तचे परराष्ट्रमंत्री सिरियात दाखल

arab leagueदमास्कस/कैरो – गेल्या काही दिवसांपासून अरब नेते व सिरियातील जवळीक वाढू लागली आहे. अरब लीगच्या नेत्यांनी सिरियाला दिलेल्या भेटीनंतर इजिप्तचे परराष्ट्रमंत्री सिरियात दाखल झाले असून त्यांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांची भेट घेतली. सिरियातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अरब नेते सिरियाला भेट देत असल्याचा दावा केला जातो. पण अरब नेत्यांच्या या भेटीमुळे सिरियाचा जवळचा सहकारी देश असलेला इराण अस्वस्थ झाल्याचेही आखाती विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दोन आठवड्यांपूर्वी तुर्की व सिरियाला प्रलयंकारी भूकंपाने हादरवून सोडले. यामधील बळींची संख्या ५० हजारांवर पोहोचली असून एकट्या तुर्कीमध्ये ४५ हजार जणांचा बळी गेला. तर तुर्कीच्या तुलनेत सिरियामध्ये या भूकंपाने मोठी हानी केली नाही. पण आंतरराष्ट्रीय स्तरातून सिरियाला मिळणारे सहाय्य देखील फारच त्रोटक होते. अमेरिका व संयुक्त राष्ट्रसंघाने टाकलेल्या निर्बंधांमुळे मोजक्याच देशांनी सिरियातील भूकंपपीडितांसाठी सहाय्य पोहोचवू शकले. यामध्ये भारत, सौदी अरेबिया, युएई, इजिप्त, इराण या देशांचा समावेश होता.

assad egyptअशा परिस्थितीत, गेल्या काही दिवसांपासून अरब देशांच्या नेत्यांनी सिरियाला भेट देण्याचा सपाटा लावला आहे. सौदी अरेबियाच्या प्रतिनिधीनंतर अरब लीगच्या शिष्टमंडळाने सिरियाचा दौरा केला होता. याला काही तास उलटत नाही तोच सोमवारी इजिप्तचे परराष्ट्रमंत्री सामेह शोक्री राजधानी दमास्कसमध्ये दाखल झाले. त्यांनी सिरियन राष्ट्राध्यक्ष बाशर अल-अस्साद यांची भेट घेतली. सिरियातील भूकंपपीडितांसाठी अस्साद सरकारने केलेल्या सहाय्याचे इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तारीफ केल्याच्या बातम्या सिरियन यंत्रणा देत आहेत. तर अरब लीग देखील सिरियाला आपल्या संघटनेत पुन्हा सामील करून घेण्यावर विचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. २०११ साली सिरियामध्ये अस्साद राजवटीच्या विरोधात भडकलेल्या गृहयुद्धानंतर अरब लीगने सिरियाचे सदस्यत्व काढून घेतले होते. अस्साद राजवट आपल्याच जनतेचे हत्याकांड घडवित असल्याचा आरोप अरब लीगने केला होता. यानंतर सिरिया व अरब देशांमधील संबंध बिघडले होते. सौदी व अरब मित्रदेशांनी सिरियातील युद्धात अस्साद राजवटीच्या विरोधात अमेरिका व नाटोला सहकार्य केल्याचा आरोपही झाला होता.

पण १२ वर्षानंतर सिरिया व अरब देशांमध्ये जवळीक वाढल्याचे विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. पण सिरियाचा मित्रदेश असलेला इराण या जवळीकीमुळे अस्वस्थ होऊ शकतो, याकडे आखाती विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply