लिपुलेखजवळ चीनच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांचा ‘सेन्ट्रल कमांड’चा दौरा

नवी दिल्ली – कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार रहा, असा आदेश लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी ४ कॉर्प्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील भारत-चीन सीमेवरील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ४ कॉर्प्सच्या कमांडर्सला लष्कर प्रमुखांनी दिलेले हा आदेश भारत या आघाडीवरही सज्ज असल्याचा चीनला दिलेला इशारा ठरतो. तसेच लष्करप्रमुखांनी यानंतर लखनऊ येथील सेन्ट्रल कमांडच्या मुख्यलायला भेट देऊन नेपाळ सीमेवर चीनच्या सुरु असलेल्या हालचालींवरही भारतीय लष्कराचे बारकाईने लक्ष असल्याचा संदेश दिला आहे.

'सेन्ट्रल कमांड'

भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेली पाचव्या टप्पातील चर्चा निष्फळ ठरली आहे. पुन्हा एकदा दोन्ही देशांचे अधिकारी चर्चा करणार असल्याच्या बातम्या येत असताना लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी आसामच्या तेजपूर येथील ४ कॉर्प्सच्या मुख्यलायला भेट दिली होती. दोन दिवसांच्या या दौऱ्यात सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील लष्कराच्या सज्जतेचा आढावा जनरल नरवणे यांनी घेतला.

त्यानंतर त्यांनी लखनऊ येथील सेन्ट्रल कमांडच्या मुख्यलायला दिली. उत्तराखंडच्या लिपुलेख जवळ भारत-नेपाळ आणि चीनच्या सीमा भिडणाऱ्या भागात चीनने तैनाती वाढविल्याची बातम्या आल्या होत्या. लिपुलेख येथील सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी सेन्ट्रल कमांड अंतर्गत येत असल्याने लष्कर प्रमुखांच्या या दौऱ्याचे महत्व वाढते. नेपाळचे सरकार चीन धार्जिणी धोरणे राबवित असून लिपुलेख, कालापानीवर नेपाळने दावा ठोकला आहे. त्यानंतर या भागात चीनच्या हालचाली अधिक वाढल्याचे समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांचा हा दौरा महत्वाचा ठरतो.

leave a reply