बढाईखोर चीन इतरांवर अटी लादू शकत नाही

- ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र सचिवांनी ठणकावले

अटीकॅनबेरा/बीजिंग – ‘गेल्या काही वर्षात चीनचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामर्थ्य वाढले आहे. त्यामुळे आपण जगातील इतर देशांवर अटी व नियम लादू शकतो, असे चीनला वाटू लागले आहे. ही बाब चीनला आपल्या सामर्थ्याबाबत गैरसमज झाल्याचे दाखवून देत आहे. चीनला अजूनही या आघाडीवर खूप मोठी मजल मारायची आहे’, अशा खरमरीत शब्दात ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र सचिव फ्रान्सेस ॲडम्सन यांनी चीनला ठणकावले. जागतिक व्यवस्थेचा भाग असणाऱ्या चीनने जबरदस्ती अथवा दबावाचा वापर न करता काम करायला शिकावे, असा टोला ॲडम्सन यांनी लगावला.

हुवेई या चिनी कंपनीवर घातलेली बंदी, हाँगकाँग व झिंजियांगमधील चीनच्या कारवाईवर केलेली जोरदार टीका, चीनच्या गुंतवणुकीला केलेला विरोध यामुळे चीन ऑस्ट्रेलियाविरोधात चांगलाच बिथरला आहे. कोरोनाव्हायरसच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करून ऑस्ट्रेलियाने आपला घात केल्याची चीनची भावना आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियासारख्या देशात आपल्या हस्तकांमार्फत राजकीय हस्तक्षेप करण्याचा कुटील डाव उधळण्यासाठी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हाती घेतलेल्या ठाम उपाययोजना चीनला अस्वस्थ करीत आहेत. त्यामुळेच चीनने ऑस्ट्रेलियाला गंभीर परिणामांची धमकी देत व्यापारयुद्ध छेडले आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने चीनला शत्रू मानलेच तर चीन ऑस्ट्रेलियाला शत्रूसारखीच वागणूक देईल, अशी धमकीही चीनने दिली.

अटी

चीनच्या या वर्तनाचा परराष्ट्र सचिव ॲडम्सन यांनी समाचार घेतला. ‘चीनने केलेल्या आर्थिक प्रगतीचा ऑस्ट्रेलियासह इतर देशांना नक्कीच फायदा झाला आहे. पण त्याचवेळी या क्षेत्रात अव्यवस्थाही निर्माण झाली आहे. महाशक्ती बनलेल्या चीनबाबत पावले उचलताना जगातील इतर देश बराच विचार करतात. मात्र हीच गोष्ट चीन इतर देशांबाबत पाळताना दिसत नाही. महाशक्ती असलेला व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा भाग बनलेला इतका मोठा देश त्याचा भाग असणाऱ्या कोणत्याही गोष्टीची तपासणी अथवा चर्चा यापासून पळ काढू शकत नाही’, अशी चपराक ॲडम्सन यांनी लगावली.

‘सध्या जागतिक व्यवस्थेचा भाग असलेले नियम व चौकटी स्वीकारण्याची चीनची तयारीच नसून या देशाला फक्त त्यांचे निकष तसेच अटी लादायच्या आहेत. चीनला आंतरराष्ट्रीय यंत्रणांमध्ये केवळ सहभागी व्हायचे नाही. तर त्या सर्व यंत्रणा आपल्याच नेतृत्त्वाखाली याव्या अशी चीनची महत्त्वाकांक्षा आहे’, असा टोलाही ऑस्ट्रेलियन सचिवांनी लगावला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे चीनबाबतचे धोरण अमेरिकेच्या निर्देशांवर ठरते, हा आरोपही ॲडम्सन यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावला.

leave a reply