इराणविरोधात इस्रायलचे आपल्या लष्कराला सज्जतेचे आदेश

- अमेरिकी संकेतस्थळाचा दावा

सज्जतेचे आदेशअर्लिंग्टन – 20 जानेवारी रोजी ज्यो बायडेन यांना अमेरिकेची सूत्रे सुपूर्द करण्याआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला चढवू शकतात. असे झाल्यास थेट इराणकडून किंवा सिरिया, लेबेनॉन व गाझापट्टीतील इराणसंलग्न दहशतवादी गटांकडून इस्रायलवर हल्ला चढविला जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या लष्कराला या इराणविरोधात सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील संकेतस्थळाने इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली.

बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याआधीचा काळ फारच संवेदनशील असल्याचा दावा अमेरिकी संकेतस्थळाने केला आहे. यासाठी सदर संकेतस्थळाने गेल्या दोन आठवड्यांच्या घडामोडींचा दाखला दिला. 2015 सालच्या अणुकराराचे उल्लंघन करुन 12 पट अधिक संवर्धित युरेनियमचा साठा करणाऱ्या इराणवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हल्ला चढविण्याची तयारी केली होती. पण प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर ट्रम्प यांनी आपला निर्णय मागे घेऊन इतर पर्यायांचा विचार सुरू केला होता. त्याचबरोबर अमेरिकेने इराणवरील हल्ल्याचा पर्याय सोडून दिला नसल्याचेही सदर अधिकाऱ्यांनी बजावले होते. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकी वर्तमानपत्राने ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांचा हवाला देऊन ही बातमी प्रसिद्ध केल्याचे या संकेतस्थळाने लक्षात आणून दिले.

सज्जतेचे आदेश

 

ट्रम्प प्रशासनाने सदर बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण गेल्या दोन आठवड्यात ट्रम्प यांनी तडकाफडकी नियुक्त केलेले हंगामी संरक्षणमंत्री ख्रिस्तोफर मिलर यांनी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांच्याशी दोन वेळा चर्चा केली आहे. सिरियातील घडामोडींबरोबर अमेरिका व इस्रायलमधील संरक्षण सहकार्याबाबत या दोन्ही संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचा दावा अमेरिकी संकेतस्थळाने केला आहे. या घडामोडी सुरू असताना, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी रविवारी सौदी अरेबियाचा दौरा करुन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. इराणच्या मुद्यावर इस्रायल व सौदीच्या नेत्यांमध्ये चर्चों झाल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्याने केल्याचे अमेरिकी संकेतस्थळाने आपल्या बातमीत म्हटले आहे.

 

सज्जतेचे आदेशअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्या उपस्थितीत क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्यात चर्चा सुरू असताना, अमेरिकेची ‘बी-52’ बॉम्बर विमाने आखातात दाखल झाली आहेत. याच सुमारास, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचे सल्लागार हुसेन देहघान यांनी अमेरिकेला धमकावले होते. अमेरिकेने इराणवर हल्ला चढविला तर आखातात सर्वंकष युद्ध भडकेल, अशी धमकी देहघान यांनी दिली होती, याकडेही या अमेरिकी संकेतस्थळाने लक्ष वेधले.

अमेरिकेचा हल्ला झाल्यास, इराण आपल्या क्षेत्रातील अमेरिकेच्या मित्रदेशांवर हल्ले चढवून त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इराणने याआधी दिली होती. त्यामुळे इस्रायला इराणच्या हल्ल्याचा सर्वाधिक धोका आहे. इराणसंलग्न हिजबुल्लाह, हमास, इस्लामिक जिहाद तसेच सिरिया व इराकमधील दहशतवादी गटांमार्फत किंवा थेट हल्ला चढवून इराण इस्रायलला लक्ष्य करू शकतो. त्यामुळे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या लष्कराला दिलेले सज्जतेचे आदेश लक्ष वेधून घेणारे ठरतात.

leave a reply