देशात प्रथमच ‘हिंग’ लागवड होणार

नवी दिल्ली – भारतीय स्वयंपाक घरातील महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ आणि औषधी गुणधर्मासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंगाचे उत्पादन देशातच केले जाणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशातील लाहौल व्हॅलीतील क्वेरिंग गावात समुद्रसपाटीपासून सुमारे ११ हजार फूट उंचीवर देशातील पहिली हिंगाची लागवड करण्यात आली. या हिंग प्रजाती पालमपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसॉर्स टेक्नॉलॉजीच्या(आयएचबीटी) प्रयोगशाळेत शास्त्रोक्त पद्धतीने विकसित करण्यात आल्या आहेत.

'हिंग'

भारतात वर्षाकाठी १२०० टन हिंगाची आयात होते. यामध्ये अफगाणिस्तानातून ९० टक्के, उज्बेकिस्तानातून ८ आणि इराणहून २ टक्के हिंग आयात केला जातो. जगभरात आयात होणाऱ्या हिंगामध्ये एकट्या भारतात ५० टक्के हिंगाची आयात केली जाते. ही हिंगाची सर्वाधिक आयात मानली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात हिंगाची किंमत ३५ हजार रुपये प्रति किलो आहे. हिंग आयातीसाठी दरवर्षी सुमारे १० कोटी डॉलर्स इतका खर्च होतो. गेल्यावर्षी अफगाणिस्तान, इराण आणि उझबेकिस्तान येथून अंदाजे १,५०० टन कच्ची हिंग आयात करण्यात आली आणि त्यासाठी सुमारे ९४२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

'हिंग'

आयएचबीटीचे संचालक डॉ. संजय कुमार यांनी क्वेरींगमधील एका शेतात हिंगाच्या रोपट्याची लागवड केली. देशात आत्तापर्यंत हिंगाची शेती झालीच नाही. अफगाणिस्तानातून हिंगाचे बीयाणे आणून आयएचबीटीने शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे रोपटे विकसित केले आहे. आयएचबीटीच्या संशोधकांनी हिंगाच्या सात प्रजाती विकसित केल्या आहेत. या हिंग लागवडीसाठी २० ते ३० डिग्री तापमान असणे आवश्यक आहे अशी माहिती आयएचबीटीच्या संचालकांनी दिली आहे.

'हिंग'

पुढील पाच वर्षांत हिंगाच्या शेतीसाठी हेक्टरी सुमारे ३ लाख रुपये शेतकऱ्यांना खर्च करावे लागतील आणि पाचव्या वर्षापासून त्यांना किमान १० लाख रुपये निव्वळ परतावा मिळेल. ह्याचे पीक देशाच्या थंड वातावरणातील शेतकर्‍यांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. ३०० हेक्टरची जमीन या शेतीसाठी निवडण्यात आली आहे, अशी माहिती आयएचबीटीचे संचालक डॉ. संजय कुमार यांनी दिली आहे.

आयएचबीटीने हिंग उत्पादनासाठी लाहौल-स्पीती हा देशातील पहिला जिल्हा म्हणून निवडला आहे. त्यानंतर या हिंग बियाणांचे वाटप मॅडग्रा, बिलिंग, केलोँग आणि क्वेरींगमधील सात शेतकर्‍यांना करण्यात येणार आहे. थंडगार प्रदेश हिंग लागवडीसाठी उपयुक्त आहे. हा उपक्रम यशस्वी झाला तर इथल्या शेतकर्‍यांच्या आयुष्यात बदल घडेल, असा विश्वास ‘आयएचबीटी’च्या संशोधकांनी व्यक्त केला आहे.

leave a reply