साऊथ चायना सीमधील ‘कोड ऑफ कंडक्ट’च्या मुद्यावर ‘आसियन’ने चीनविरोधात दक्षता बाळगणे आवश्‍यक

- फिलिपाईन्सच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले

‘कोड ऑफ कंडक्ट’मनिला/बीजिंग – साऊथ चायना सीमधील वाद सोडविण्यासाठी सुरू असलेल्या ‘कोड ऑफ कंडक्ट’शी संबंधित वाटाघाटींमध्ये ‘आसियन’ देशांनी चीनविरोधात दक्षता बाळगून ठाम भूमिका घेण्याची गरज आहे, असे फिलिपाईन्सच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे. यावेळी माजी परराष्ट्रमंत्री अल्बर्ट डेल रोझारिओ यांनी 2016 सालच्या आंतरराष्ट्रीय निकालाचा उल्लेख करून, या निकालाला दूर सारण्यासाठी चीन ‘कोड ऑफ कंडक्ट’चा वापर करेल, असा इशाराही दिला. गेल्या काही महिन्यात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने ‘साऊथ चायना सी’मधील हालचाली अधिकच आक्रमक केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर फिलिपिनी मंत्र्यांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

गेल्या दशकात फिलिपाईन्सचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री अल्बर्ट डेल रोझारिओ यांच्या नेतृत्त्वाखाली चीनच्या साऊथ चायना सीमधील दाव्यांविरोधात आंतरराष्ट्रीय लवादासमोर दावा ठोकण्यात आला होता. या दाव्याचा निकाल फिलिपाईन्सच्या बाजूने लागला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी’नुसार फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील विशेष आर्थिक क्षेत्राला मान्यता दिली होती. त्यामुळे संपूर्ण ‘साऊथ चायना सी’ आपल्या मालकीचा आहे, या चीनच्या दाव्यांना धक्का बसला होता.

चीनने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय नाकारत ‘आसियन’ देशांशी स्वतंत्र पातळीवर चर्चा सुरू केली होती. ‘कोड ऑफ कंडक्ट’ त्याचाच भाग असल्याचे मानले जाते. या माध्यमातून चीन 2016 साली आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेला निर्णय बाजूला सारण्याचे कारस्थान रचित असल्याचा आरोप फिलिपाईन्सच्या माजी मंत्र्यांनी केला. चीनच्या विस्तारवादी धोरणाचा भाग असलेले हे कारस्थान ‘आसियन’ देशांनी हाणून पाडायला हवे, असे फिलिपाईन्सचे माजी परराष्ट्रमंत्री रोझारिओ यांनी बजावले.

‘कोड ऑफ कंडक्ट’पुढच्या वर्षी ‘आसियन’ व चीनमधील कोड ऑफ कंडक्टची चर्चा पूर्ण होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘आसियन’ची एकजूट व पत दोन्ही पणाला लागली असल्याची जाणीव फिलिपिनी मंत्र्यांनी करून दिली. आसियनने चीनचा रबरस्टॅम्प न होण्याची काळजी घ्यायला हवी, त्यासाठी सावधगिरी बाळगायला हवी असा इशारा अल्बर्ट डेल रोझारिओ यांनी दिला. चीन जर त्याच्या इराद्यांमध्ये यशस्वी ठरला तर ‘आसियन’ देशांनी आतापर्यंत मिळविलेले यश धुळीला मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

गेल्या काही महिन्यात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या युद्धनौका, लढाऊ विमाने, टेहळणी विमाने तसेच ‘नेव्हल मिलिशिया’ सातत्याने आसियन देशांच्या हद्दीत घुसखोरी करतााना दिसत आहेत. चीनच्या या सातत्याने सुरू असलेल्या कारवायांमुळे त्रस्त झालेल्या ‘आसियन’ देशांनी चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनविरोधात तणावपूर्ण संबंध असणाऱ्या फिलिपाईन्सच्या माजी मंत्र्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply