बायडेन प्रशासनाच्या ‘अफगाणिस्तान डिझास्टर’मुळे अमेरिकेची प्रतिष्ठा धुळीला मिळाली

- ‘ब्लॅकवॉटर’चे प्रमुख एरिक प्रिन्स

‘ब्लॅकवॉटर’वॉशिंग्टन/काबुल – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने अफगाणिस्तानात घडविलेल्या ‘डिझास्टर’मुळे अमेरिकेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत धुळीला मिळाली आहे, असा टोला ‘ब्लॅकवॉटर’ या कंत्राटी लष्करी कंपनीचे प्रमुख एरिक प्रिन्स यांनी लगावला. अफगाणिस्तानात जे काही घडले, ते पाहता सध्या अवशेषांच्या रुपात जी काही नाटो दिसते आहे, तीही पुढील काळात नष्ट झालेली असेल, असा दावाही प्रिन्स यांनी केला. तसेच त्यांनी अमेरिकी लष्कराच्या क्षमतेवरही सवाल उपस्थित केले.

‘अमेरिकेच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची खरडपट्टी काढण्यात आली. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. आपल्या युरोपिय मित्रदेशांचा आपल्यावर असलेला विश्‍वास आपणच धुळीस मिळविला आहे. केवळ युरोपिय मित्रदेशांचाच नाही, तर जगातील प्रत्येक सहकाऱ्याचा विश्‍वास अमेरिकेने गमावला आहे. यात सीआयएकडून तयार केल्या जाणाऱ्या एजंटस्‌पासून ते चीनविरोधात अमेरिकेच्या बाजूने उभे राहणाऱ्या देशांचाही समावेश आहे. देश असो वा व्यक्ती प्रत्येकाच्या मनात अमेरिकेने अफगाणिस्तानातील मित्रांना कसे झटकन सोडून दिले, हाच विचार सतत येत राहिल’, अशा शब्दात प्रिन्स यांनी बायडेन प्रशासनाला धारेवर धरले.

‘अमेरिका अत्यंत घाईगडबडीत व प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण करीत अफगाणिस्तानातून माघारी येत आहे. सहाव्या शतकातील विचारसरणी बाळगणाऱ्या व 70 वर्षे जुनी शस्त्रे वापरणाऱ्यांकडून अमेरिकी लष्कराचा पराभव झाला आहे. ही बाब ज्यावेळी समोर येते, त्यावेळी अमेरिकी लष्कर ज्या प्रमाणात दाखविते तेवढी क्षमता त्याकडे खरेच आहे का हा सवाल उपस्थित होतो’, अशी टीका ‘ब्लॅकवॉटर’च्या प्रमुखांनी केली. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेली मुलाखतीत प्रिन्स यांनी 2008 साली ‘ब्लॅकवॉटर’ कंपनीच्या पथकानेच तत्कालिन अमेरिकी सिनेटर ज्यो बायडेन, जॉन केरी व चक हेगेल यांना अफगाणिस्तानमधील तालिबानच्या जागेतून सुरक्षित बाहेर काढले होते, असा दावा केला आहे.

‘ब्लॅकवॉटर’ ही अमेरिकेतील आघाडीची खाजगी लष्करी कंत्राटदार कंपनी असून 1997 सालापासून कार्यरत आहे. या कंपनीने अमेरिकेसाठी अफगाणिस्तान, इराक, सिरिया, लिबिया अशा अनेक देशांमध्ये गोपनीय मोहिमा राबविल्या आहेत. इराक तसेच लिबियातील मोहिमांवरून या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईही सुरू आहे. 2017 साली ‘ब्लॅकवॉटर’चे प्रमुख एरिक प्रिन्स यांनी अफगाणिस्तानमधील युद्ध खाजगी लष्करी कंत्राटदार कंपन्यांकडे सोपवावे, असा प्रस्ताव दिल्याचे याआधी समोर आले होते.

leave a reply