क्वाडवरील एशियन नाटोचा आरोप म्हणजे माईंड गेम

- भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

माईंड गेमनवी दिल्ली – इंडो-पॅसिफिकच्या बांधणीद्वारे आपण शीतयुद्धाच्या काळातून बाहेर आल्याचा संदेश दिला जात आहे, शीतयुद्ध सुरू झाल्याचा नाही, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलियाचे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात खडे ठाकत असलेले क्वाड संघटन म्हणजे आशियाई नाटो असल्याचा आरोप रशियाकडून केला जात आहे. त्याला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हे उत्तर दिले. त्याचवेळी भारत केवळ एडनचे आखात आणि मलाक्काच्या आखातापुरता मर्यादित राहणार नाही, भारताचा प्रभाव याच्याही पलिकडील क्षेत्रात वाढेल हा इंडो-पॅसिफिकचा अर्थ असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी क्वाड म्हणजे आशियाई नाटो असल्याचा आरोप म्हणजे माईंड गेम असल्याचा ठपका परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ठेवला आहे.

रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय कुडाशेव्ह यांनी पाश्‍चिमात्य देशांच्या इंडो-पॅसिफिक धोरणावर टीका केली होती. बुधवारी माध्यमांशी बोलताना कुडाशेव्ह यांनी हा अत्यंत घातक असा शीतयुद्धकालीन मानसिकतेचा खेळ असल्याचे बजावले होते. त्यांनी यामागे पाश्‍चिमात्य देश असल्याचे सांगून यासाठी भारताला जबाबदार धरण्याचे टाळले खरे. पण भारत क्वाडमध्ये सक्रीय असल्याने पाश्‍चिमात्यांच्या या खेळात भारतही सहभागी झाल्याचे अप्रत्यक्ष आरोप रशियन राजदूतांकडून केला जात आहे. त्याच्या आधी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनीही आपल्या भारतभेटीत आपण ‘एशियन नाटो’बद्दल चर्चा ऐकलेली आहे, असे सूचक उद्गार काढले होते. त्यामुळे भारताच्या क्वाडमधील सहभागावर रशियाकडून वेगवेगळ्या मार्गाने नाराजी व आक्षेप नोंदविले जात असल्याचे दिसत आहे.

नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारताच्या ‘रायसेना डायलॉग’ या सुरक्षाविषयक परिषदेत बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या आक्षेपांना उत्तर दिले. फ्रान्स व ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री देखील या परिषदेत सहभागी होत आहेत. यावेळी बोलताना जयशंकर यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्राची बांधणी म्हणजे शीतयुद्ध नव्याने सुरू करण्याचे प्रयत्न नाहीत, अशी ग्वाही दिली. उलट शीतयुद्धातून बाहेर येऊन जग पुढे जात असल्याचा संदेश याद्वारे दिला जात आहे, असा दावा जयशंकर यांनी केला. ‘एशियन नाटो’सारख्या शब्दाचा वापर करून काहीजण माईंड गेम अर्थात मानसिक दबावाचा खेळ करीत असल्याचा ठपका जयशंकर यांनी ठेवला. राष्ट्रीय हित, या क्षेत्राचे हित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील हित डोळ्यासमोर ठेवून क्वाडचे सदस्यदेश एकत्र येत आहेत. हे हित साधण्याचा क्वाडचे संघटन हा एक मार्ग आहे, असा दावा भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

भारताकडून हा खुलासा केला जात असतानाच, नाटोचे प्रमुख जीन स्टोल्टनबर्ग यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत हा मध्यवर्ती भूमिका पार पाडणारा देश असल्याचा दावा स्टोल्टनबर्ग यांनी केला. रायसेना डायलॉगला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना स्टोल्टनबर्ग यांनी केलेला हा दावा लक्षवेधी ठरत आहे. केवळ इंडो-पॅसिफिकच नाही तर जगातिक पातळीवर भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश ठरतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसैन्यासाठी भारताने फार मोठे योगदान दिलेले आहे, याचीही आठवण स्टोल्टनबर्ग यांनी करून दिली. तसेच तसेच २०२३ साली जी-२० परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे, असेही यावेळी नाटोचे प्रमुख पुढे म्हणाले.

दरम्यान, रशियासारख्या मित्रदेशाकडून भारतावर आशियाई नाटोमध्ये सहभागी होण्याचा आक्षेप नोंदविला जाणे व त्याला भारताने सडेतोड उत्तर देणे ही लक्षणीय बाब ठरते. चीनची आक्रमकता वाढत असताना, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील समतोल धोक्यात आला आहे. या क्षेत्रासमोर चीनच्या विस्तारवादाचे भयंकर संकट खडे ठाकले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी क्वाडच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. इतकेच नाही तर क्वाडच्याही पलिकडे जाणारे क्वाड प्लसची मागणी, अर्थात क्वाडमध्ये इतर देशांचाही समावेश करण्याची मागणी पुढे येत आहे.

या क्वाड प्लससाठी फ्रान्स, ब्रिटन हे युरोपिय देश तसेच दक्षिण कोरिया, कॅनडा या देशांचाही विचार सुरू असल्याचे दावे केले जातात.

leave a reply