लडाखच्या एलएसीवरील तणाव संपलेला नाही

- अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा अहवाल

गुप्तचरवॉशिंग्टन – भारत आणि चीनने लडाखच्या एलएसीवर सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पण अजूनही इथला तणाव संपलेला नाही. यावरून दोन्ही देशांचे संबंध अजूनही तणावपूर्ण आहेत, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने आपल्या अहवालात केला आहे. याआधी भारताच्या लष्करप्रमुखांनीही लडाखच्या एलएसीवरील धोका टळला असला तरी, धोका संपलेला नाही, असे स्पष्ट केले होते. त्याचे प्रतिबिंब अमेरिकी गुप्तचर विभागाच्या अहवालात पडल्याचे दिसत आहे.

भारत आणि चीनमध्ये लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चेची ११ वी फेरी नुकतीच पार पडली. या चर्चेतून फारसे काही हाती लागले नाही. भारताची मागणी अमान्य करण्याचा निश्‍चय करूनच चीनचे लष्करी अधिकारी या चर्चेत सहभागी झाले होते, असा दावा भारतीय लष्करी अधिकार्‍यांनी केला होता. या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध झालेले नाही. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने देखील याकडे बोट दाखवून इथला तणाव निवळलेला नसल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी याला भारत जबाबदार असल्याचा दावा चीनचे हे सरकारी मुखपत्र करीत आहे.

अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑॅफ नॅशनल इंटेलिजन्स-ओडीएनआय’ने आपल्या अहवालात लडाखच्या एलएसीवरील परिस्थितीची माहिती दिली आहे. इथला तणाव अजूनही संपलेला नाही व यामुळे भारत व चीनचे संबंध तणावपूर्णच आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. लडाखच्या एलएसीवरील काही भागातून दोन्ही देशांनी सैन्य मागे घेतले असले तरी त्याचा इथल्या तणावावर परिणाम झालेला नाही, असे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी देखील काही दिवसांपूर्वी, हा इशारा दिला होता.

लडाखच्या एलएसीवरील ‘गोग्रा’, ‘हॉट स्प्रिंग’ व ‘डेप्सांग’ इथे अजूनही चीनचे लष्कर तैनात आहे. इथले लष्कर माघारी घेतल्याखेरीज एलएसीवर सौहार्द प्रस्थापित होणार नाही, हे भारताने चीनला वारंवार बजावले होते. पण चीन इथून माघार घ्यायला तयार नाही. यामुळे भारतीय लष्करानेही चीनच्या विरोधात आवश्यक त्या हालचाली सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यानुसार सदर क्षेत्रात उन्हाळ्याच्या काळातील सैन्यतैनाती सुरू करण्यात आली आहे. हा भारतीय सैन्याच्या नियमित तैनातीचा भाग मानला जातो. मात्र सदर क्षेत्रातील चीनबरोबरील तणाव निवळलेला नसताना, भारतीय सैन्याने सुरू केलेल्या या हालचाली चीनला योग्य तो संदेश देणार्‍या असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

भारताची मागणी मान्य करून या क्षेत्रातून माघार घेणे आपल्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे ठरेल, असा समज चीनने करून घेतलेला आहे. लडाखच्या एलएसीवरील तणावात भारत चीनला टक्कर देण्याची धमक असलेला देश म्हणून जगासमोर आलेला आहे. ही बाब चीनला चांगलीच खटत असून भारताला धक्का देण्याचा आणखी एक प्रयत्न चीनकडून केला जाईल, असा इशारा माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषक देत आहेत. भारतीय लष्करी अधिकार्‍यांनी आपण चीनपासून सावध असल्याचे सांगून चीनच्या लष्करावर भारतीय सैन्याची करडी नजर रोखलेली असल्याची ग्वाही दिली आहे.

leave a reply