आसाममध्ये भारत-जपानच्या धोरणांचा समन्वय झाला आहे

- जपानचे राजदूत सातोशी सुझूकी

समन्वयगुवाहाटी – ‘‘भारताचे ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ आणि जपानचे मुक्त ‘इंडो-पॅसिफिक’बाबतचे धोरण यांचा समन्वय भारताच्या ईशान्येकडील भागात झालेला आहे. पुढच्या काळात भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी जपान फार मोठे योगदान देईल’’, असे जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझूकी यांनी म्हटले आहे. तर आसाम राज्य भारताच्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणासाठी ‘स्प्रिंगबोर्ड’चे काम करील, असा विश्‍वास भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला.

परराष्ट्रमंत्री जयशंकर व जपानचे राजदूत सुझूकी यांनी आसामला भेट देऊन या राज्यात जपानच्या सहकार्याने सुरू असलेल्या विकासप्रकल्पांचा आढावा घेतला. ‘जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी’ने (जेआयसीए) आसाममध्ये काही प्रकल्पांना सहाय्य पुरविले आहे. आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे राज्यांचा विकास अधिक वेगाने साधता येऊ शकतो, हे आसाममधील सदर प्रकल्प दाखवून देत असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले. त्याचवेळी आसाम भारताच्या अ‍ॅक्ट ईस्ट धोरणासाठी स्प्रिंगबोर्डचे काम करील, असा विश्‍वासही परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला. आसाममध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित करून या राज्याचा वापर पूर्वेकडील देशांबरोबरील जोडण्यासाठी केला जाईल, असे आश्‍वासन यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी दिले.

जपानच्या राजदूतांनी आसाम तसेच ईशान्येकडील इतर राज्यांच्या विकासासाठी जपान फार मोठी भूमिका पार पाडण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. भारताचे ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ व जपानचे मुक्त ‘इंडो-पॅसिफिक’ धोरण यांचा समन्वय आसाममध्ये झालेला आहे, असे सांगून राजदूत सुझूकी यांनी आसामचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचवेळी दुसर्‍या महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या जपानला भारताने त्या काळात भरीव सहाय्य केले होते, याचे कृतज्ञतापूर्ण स्मरण यावेळी जपानच्या राजदूतांनी केले.

‘‘भारताने केलेले हे सहाय्य लक्षात ठेवून जपानला आपली जबाबदारी पार पडायची आहे. आशियात सर्वात आधी विकसित झालेली अर्थव्यवस्था अशी जपानची ओळख आहे. जपान या आघाडीवर आशियाई देशांना आपल्या अनुभवाचा फायदा मिळवून देऊ शकतो. आशियाई देशांना उपलब्ध करून देण्यासारखे जपानकडे बरेच काही आहे. जपानला भारताबरोबर अजूनही बर्‍याच गोष्टी ‘शेअर’ करायच्या आहेत’’, असे सूचक उद्गार राजदूत सुझूकी यांनी काढले. तसेच आसाम आपल्याला दुसरे घर असल्यासारखे वाटते, असे सांगून राजदूत सुझूकी यांनी या राज्याबद्दल आत्मियता व्यक्त केली.

आसाम तसेच ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये पायाभूत सुविधा तसेच इतर विकासप्रकल्प राबविण्यासाठी जपान भारताला सहाय्य करीत आहे. याबाबत जपान दाखवित असलेले स्वारस्य चीनची चिंता वाढवित आहे. यावर चीनने आक्षेपही नोंदविला होता. मात्र जपानने याबाबत ठाम भूमिका स्वीकारून चीनचे आक्षेप धुडकावून लावले होते.

भारत ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास करीत असून यासाठी जपानचे सहाय्य घेत आहे, ही बाब चीनच्या अस्वस्थतेत भर घालणारी ठरते. भारत व जपानचे सहकार्य आपल्याला आव्हान देण्यासाठीच असल्याचा आरोप चीनकडून केला जातो. मात्र आशियातील प्रमुख लोकशाहीवादी देश असलेल्या भारत व जपानचे सहकार्य ही अत्यंत स्वाभाविक बाब ठरते, अशी ठाम भूमिका दोन्ही देशांनी घेतलेली आहे. चीनबरोबरील सीमावाद असलेल्या भारत व जपानमध्ये आर्थिक, राजकीय व सामरिक पातळीवरील सहकार्य इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे स्थैर्य कायम राखून या क्षेत्रात समतोल निर्माण करील, असा विश्‍वास विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. चीनच्या आक्रमकतेमुळे या क्षेत्रात निर्माण झालेल्या असमतोलाच्या पार्श्‍वभूमीवर, भारत व जपानच्या या धोरणात्मक सहकार्याचे महत्त्व अनेकपटींनी वाढल्याची जाणीव विश्‍लेषकांकडून करून दिली जात आहे.

leave a reply