चिनी लष्कराने लडाखच्या एलएसीवरून गाशा गुंडाळला

एलएसीवरूननवी दिल्ली/बीजिंग – ‘चीनने एकाच दिवसात २०० हून अधिक रणगाडे लडाखच्या एलएसीवरून मागे घेतले. ही एकच बाब चीन एलएसीवर सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे दाखवून देत आहे. त्याचवेळी इतक्या वेगाने या क्षेत्रातून माघार घेणारा चीन, त्याच वेगाने या क्षेत्रात त्याची तैनातीही करू शकतो, हे सामर्थ्यही चीनने याद्वारे दाखवून दिलेले आहे’, असा दावा एका चिनी विश्‍लेषकाने केला आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने हा दावा प्रसिद्ध केला. मात्र चीनला इथून प्रतिष्ठा कायम राखून माघार घेण्याची घाई झाली होती व म्हणूनच भारताची मागणी पूर्णपणे मान्य करून चीनने इथून माघार घेतली, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषक देत आहेत.

लडाखच्या पँगाँग सरोवर क्षेत्राजवळून चीनचे लष्कर माघार घेत आहे. चीनच्या लष्कराचे सुमारे २०० रणगाडे माघारी फिरले आहेत. इतकेच नाही तर या क्षेत्रात चीनने केलेले लष्करी बांधकाम देखील गुंडाळून नेले जात आहे. याबाबत भारताने केलेल्या सार्‍या मागण्या चीनने मान्य केल्या आहेत. पँगाँग सरोवर क्षेत्रापासून माघार घेऊन चीनने फिंगर ८च्या मागे जावे, असे भारताने बजावले होते. त्यानुसार चीनचे लष्कर मागे परतले आहे. सलोखा व शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने हा प्रमाणिकपणा दाखविला, असा दावा चीनच्या तिंगहुआ विद्यापीठातील ‘नॅशनल स्ट्रॅटजी इन्स्टीट्युट’च्या ‘रिसर्च डिपार्टमेंट’चे संचालक कियान फेंग यांनी केला.

लडाखच्या एलएसीवरील ही माघार चीनच्या प्रमाणिकपणा व सामर्थ्याचेही प्रदर्शन करीत असल्याचे सांगून फेंग यांनी आपल्या देशाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र लडाखच्या पँगाँग त्सो सरोवर क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न करून चीनच्या हाती काहीही लागले नाही. उलट चीनने या घुसखोरीने बरेच काही गमावले आहे, याकडे भारताचे माजी लष्करी अधिकारी लक्ष वेधत आहेत. आपल्या घुसखोरीवर तसेच गलवान खोर्‍यातील आकस्मिक हल्ल्यावर भारतीय लष्कराकडून इतकी जबरदस्त प्रतिक्रिया येईल, याचा चीनने विचार केला नव्हता. शिवाय लडाखच्या हिवाळ्यात आपल्या लष्कराला इतका काळ तैनात ठेवावे लागेल, याचीही चीनने तयारी केलेली नव्हती. त्याचा विपरित परिणाम चिनी लष्कराच्या मनोधैर्यावर झाला होता.

लडाखच्या हवामानाची सवय नसलेले चिनी जवान इथे गारठून गेले होते. त्याचवेळी भारतीय सैन्य या क्षेत्रात सहजतेने वावरत होते. अशा परिस्थितीत चीनची सरकारी माध्यमे अपप्रचाराचा वापर करून या संघर्षात आपण वर्चस्व गाजवित असल्याचे चित्र उभे करू पाहत होते. मात्र चीनचे हे प्रयत्न अपयशी ठरले. लडाखच्या क्षेत्रात भारतीय सैन्याला तोंड देण्याची क्षमता चीनकडे नाही, हे पाश्‍चिमात्य माध्यमांनाही मान्य करावे लागले. एलएसीवरील इतर आघाड्यांवर भारतावर दडपण आणण्याचाही प्रयत्न चीनने करू पाहिला होता. भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे चीनचे हे प्रयत्नही फोल ठरले होते.

अशा परिस्थितीत लडाखच्या एलएसीवरील माघारीचे समर्थन करण्यासाठी चीनची धडपड सुरू झालेली आहे. आपल्या लष्कराने लडाखमधून माघार घेतलेली असली, तरी तांत्रिक कारण पुढे करून भारतीय लष्कर अजूनही लडाखमधून माघार घेत नसल्याची तक्रार फेंग यांनी केली आहे.

leave a reply