अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांवर हल्ला, १० जणांचा बळी

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्या ताफ्याला लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटात दहा जणांचा बळी गेला. उपराष्ट्राध्यक्ष सालेह या स्फोटातून थोडक्यात बचावले. उपराष्ट्राध्यक्ष सालेह हे तालिबान आणि पाकिस्तानचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र या स्फोटाशी आपला संबंध नसल्याचे पाकिस्तान समर्थक तालिबानने म्हटले आहे. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानच्या शांतीचर्चेला काही तास शिल्लक असताना अफगाणिस्तान भीषण स्फोटाने हादरले. या स्फोटानंतर राजधानी काबूलसह इतर शहरातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांवर हल्ला, १० जणांचा बळीबुधवारी सकाळी अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या वाहनाचा ताफा काबूलच्या दिशेने जात होता. गर्दीच्या ठिकाणी हा ताफा आल्यानंतर सालेह यांच्या वाहनाजवळ भीषण स्फोट झाला. या स्फोटात उपराष्ट्राध्यक्ष सालेह किरकोळ जखमी झाले. स्फोटाच्या ठिकाणी आजूबाजूला दुकाने असल्यामुळे दहा जण या स्फोटात दगावले, तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता पाहता बळींची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जाते. स्फोटानंतर उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करुन आपण सुखरुप असल्याचे सांगितले. तसेच या स्फोटात बळी पडलेल्यांपैकी त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांवर हल्ला, १० जणांचा बळीगेल्यावर्षी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीही सालेह यांच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. त्यावेळी सालेह यांना सुरक्षितरीत्या कार्यालयाबाहेर आणले. उपराष्ट्राध्यक्ष सालेह हे पाकिस्तान आणि तालिबानचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे ते नेहमीच दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जाते. काही तासांपूर्वीच उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी अफगाणी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान, तालिबान आणि ड्युरंड लाईनवर निशाणा साधला होता. ड्युंरड लाईन ही दुबळ्या सरकारने आखलेली लाईन आहे. यावर चर्चा होऊन तोडगा निघाला पाहिजे, असे परखड मत सालेह यांनी मांडले होते. तसेच येथील पाकिस्तानी लष्कराच्या सुरक्षा चौक्या आणि गस्तीवर सालेह यांनी टीका केली होती. या व्यतिरिक्त, अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेणार नाही, असा विश्वास सालेह यांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर झालेला हा हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो.

दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी या स्फोटाचा निषेध केला. तर जगभरातून यावर प्रतिक्रिया येत आहे. भारत, नाटो आणि युरोपिय महासंघाने या स्फोटाचा निषेध केला. दहशतवाद्यांविरोधात लढा देण्यासाठी भारत अफगाणिस्तानच्या सोबत आहे. अफगाणिस्तानात शांतता नांदण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे, असे भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे.

leave a reply