युएईला जाणार्‍या कार्गो जहाजावर हल्ला – इस्रायलचा इराणवर संशय

तेल अविव – रेड सीमधून युएईला जाणार्‍या मालवाहू जहाजावर हिंदी महासागरात हल्ला झाला. हे जहाज इस्रायली मालकीचे असल्याचा दावा लेबेनीज वृत्तवाहिनीने केला. तर इस्रायली माध्यमांनी या हल्ल्यामागे इराण असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात इस्रायल आणि इराणमध्ये अघोषित युद्ध सुरू असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

कार्गोशनिवारी उशीरा हिंदी महासागराच्या उत्तरेकडील क्षेत्रातून प्रवास करणार्‍या मालवाहू जहाजावर अचानक आग पेटली. इराण व हिजबुल्लाह संलग्न लेबेनीज वृत्तवाहिनीने सर्वप्रथम या घटनेची माहिती दिली. रेड सीमधील सौदी अरेबियाच्या जेद्दा बंदरावरुन युएईच्या जबेल अली बंदरासाठी निघालेल्या जहाजावर हा हल्ला झाला. इस्रायली मालकीच्या जहाजावर काहीतरी आदळल्याचे लेबेनीज वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते.

आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले असून यानंतर सदर जहाजाने युएईसाठी प्रवास सुरू केला आहे. त्याचबरोबर, या हल्ल्यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. पण लिबेरियाचा ध्वज असलेले सीएसएव्ही टिंडल जहाज इस्रायली मालकीचे नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. लंडनस्थित इस्रायली व्यावसायिक एअल ओफर यांच्या झोडिआक मेरिटाईम या कंपनीच्या मालकीचे होते. पण काही महिन्यांपूर्वीच इस्रायली व्यावसायिकाने सदर जहाज दुसर्‍या कंपनीला विकल्याचे स्पष्ट केले.

इस्रायली माध्यमांनी स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने या हल्ल्यासाठी इराण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सदर जहाज अजूनही इस्रायली मालकीचे असल्याचा समज झाल्यामुळे इराणने हा हल्ला घडविला. गेल्या महिन्यात इराणच्या कराज येथील सेंट्रिफ्यूजेस निर्मिती प्रकल्पात ड्रोन्सचे हल्ले झाले होते. या हल्ल्यात सदर प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. याचे उपग्रहीय फोटोग्राफ्स देखील प्रसिद्ध झाले आहेत. त्याचा सूड घेण्यासाठी इराणने सदर जहाजावर हल्ला चढविल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि इराणमधील छुपे युद्ध तीव्र झाल्याची चिंता अमेरिकी वर्तमानपत्राने व्यक्त केली होती. हिंदी महासागर, ओमानचे आखात, रेड सी तसेच सिरियाच्या सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या इस्रायल व इराणच्या मालवाहू तसेच लष्करी जहाजांवरील हल्ले वाढले आहेत. हे इस्रायल व इराणमधील अघोषित युद्ध असून यामुळे सदर सागरी क्षेत्रात तणाव वाढल्याचे दिसत आहे.

leave a reply