इराणवर हल्ला चढविल्यास इस्रायलचा विनाश होईल

इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांची धमकी

तेहरान – इस्रायलने इराणवर हल्ला चढविलाच, तर इस्रायलच्या विनाशाची प्रक्रिया अधिकच गतीमान होईल, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड्‌‍स कॉर्प्स’चे (आयआरजीसी) प्रवक्ते जनरल रामेझान शरीफ यांनी ही धमकी दिली. इस्रायल इराणवर हल्ल्याची तयारी करीत आहे आणि अमेरिकेच्या सहाय्याखेरीज इस्रायलने इराणवर हल्ल्याची तयारी ठेवावी, असे सूर इस्रायलमधून लावले जात आहेत. त्यावर बोलताना ‘आयआरजीसी’च्या प्रवक्त्यांनी ही धमकी दिली. त्याचवेळी इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याला साथ देण्यास अमेरिका तयार नाही, कारण त्यांना परिणामांची जाणीव झालेली आहे, हे यातून स्पष्ट होत असल्याचा शेराही जनरल शरीफ यांनी मारला आहे.

Ramezan-Sharifपॅलेस्टाईनमधून, सिरियाच्या गोलान सीमाभागातून आणि लेबेनॉनच्या सीमेवरूनही इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू झाले आहे. पॅलेस्टाईनमधल्या हमास व इस्लामिक जिहाद, तर लेबेनॉन व सिरियामधून हिजबुल्लाह या संघटनांनी एकाच वेळी इस्रायलवर हजारो रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा वर्षाव करण्याच्या धमक्या याआधी दिल्या होत्या. याच्या मागे इराणची व्यूहरचना असून इराणने आखाती क्षेत्रातील इस्रायलविरोधी संघटना व गटांना हाताशी धरून जोरदार हल्ल्यांची तयारी केल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्याच एका वर्तमानपत्राने यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. त्याचवेळी इराणचा अणुकार्यक्रम वेगाने पुढे सरकत असून लवकरच इराण अणुबॉम्बने सज्ज होईल, असे दावे केले जातात. अशा परिस्थितीत अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणला रोखण्याऐवजी इराणबरोबर ‘अंतरिम अणुकरार’ करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेच्या या धोरणांवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार जहाल प्रतिक्रिया देत आहे. यामुळे अमेरिकेचे सहाय्य न घेता इस्रायलने इराणवर हल्ल्याची तयारी करावी, असे सल्ले इस्रायलचे काही मुत्सद्दी व माजी लष्करी अधिकारी देत आहेत. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार याकोव्ह अमिद्रोर यांनीही इस्रायलच्या सरकारला अमेरिकेचे सहाय्य गृहित न धरता इराणवर हल्ल्याची तयारी करण्याचा सल्ला दिला आहे. इस्रायलने तसा इशारा याआधीही दिला होता. मात्र हे इशारे पोकळ नसून इस्रायलने फेब्रुवारी महिन्यात इराणवर हल्ल्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हवाई सराव देखील केला होता. याची बातमीही अमेरिकेतील वर्तमानपत्राने दिली होती. पेंटॅगॉनच्या गोपनीय कागदपत्रे उघड झाल्यानंतर ही माहिती उघड झाल्याचे सदर वर्तमानपत्राने म्हटले होते.

त्या पार्श्वभूमीवर, इराणने इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यांवरून इशारा दिल्याचे दिसते. आयआरजीसीचे प्रवक्ते जनरल रामेझान शरीफ यांनी इस्रायलकडून मिळत असलेल्या धमक्यांमध्ये काही नवे नसल्याचा दावा केला. पण अमेरिकेच्या सहाय्याखेरीज आपण इराणवर हल्ले चढवू शकतो, असा संदेश देऊन इस्रायल अमेरिकेवर दडपण टाकत आहे. ही बाब इस्रायल व अमेरिकेमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दाखवून देत आहे. अमेरिका इराणवरील हल्ल्यासाठी इस्रायलला साथ देण्यास तयार नाही. कारण तसे झाले तर अमेरिकेचे या क्षेत्रातील तळ देखील धोक्यात येतील, याची जाणीव अमेरिकेला आहे, असा दावा जनरल शरीफ यांनी केला. तसेच इस्रायलच्या सध्याच्या सरकारला सहाय्य करण्यास अमेरिका तयार नाही, याकडेही जनरल शरीफ यांनी लक्ष वेधले.

तरीही इस्रायलने इराणवर हल्ला चढविलाच, तर इस्रायलच्या विनाशाची प्रक्रिया अधिकच गतीमान होईल, असे जनरल शरीफ यांनी बजावले आहे. दरम्यान, अमेरिका व इस्रायलमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांचा फायदा घेऊन इस्रायलवरील हल्ले तीव्र करा, असा संदेश इराणने आपल्या समर्थक संघटनांना दिला आहे. इतकेच नाही तर इस्रायलमध्ये पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या सरकारविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांचा फायदा घेता येईल, असे इराण इस्रायलविरोधी संघटनांना सुचवित आहे. पण इस्रायलमधील अंतर्गत राजकीय वादाचा परिणाम इस्रायलच्या सुरक्षाविषयक धोरणावर होणार नाही, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी याआधीच बजावले होते.

leave a reply