चीनकडून कोरोनाचे सत्य दडपण्याचा प्रयत्न

- ऑस्ट्रेलियन दैनिकाचा आरोप

कॅनबेरा – चीन अजूनही कोरोना साथीच्या फैलावाची माहिती लपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा दावा ऑस्ट्रेलियन दैनिकाने केला. एका वैद्यकीय संशोधनविषयक वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन संशोधकांकडून हा लेख प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात मृतदेहांवर करण्यात येणाऱ्या अंतिम संस्कारांसंबंधातील माहितीचा वापर करण्यात आल्याचे सांगितले आहे. या लेखात, कोरोनाव्हायरसचे उगमस्थान असलेल्या वुहान शहरात साथीमुळे किमान ३६ हजार जणांचा बळी गेला असावा असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

China-Coronaऑस्ट्रेलियातील ‘ग्लॅडस्टोन ऑब्झर्व्हर’ या दैनिकाने चीनच्या कोरोना साथीबाबतच्या लपवाछपवीचे वृत्त दिले आहे. त्यासाठी वैद्यकीय संशोधनविषयक वेबसाईट असणाऱ्या ‘मेड अर्काईव्ह’वर प्रसिद्ध झालेल्या लेखाचा आधार घेतला आहे. चार संशोधकांनी लिहिलेल्या या लेखात डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या कालावधीतील माहितीचा वापर करण्यात आला आहे. चीनमधील नियमानुसार मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याच्या जागा दिवसातील फक्त चार तास चालू असतात.

वुहानमधील उपलब्ध आकडेवारीनुसार शहरात अंतिम संस्कार करण्याच्या आठ जागा आहेत. सामान्य परिस्थितीत या आठ जागांमध्ये दिवसाला सरासरी १३६ मृत व्यक्तींवर अंतिम संस्कार करण्यात येत होते. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यापासून वुहानमधील या आठही जागा पूर्ण २४ तास कार्यरत होत्या. चीनच्या यंत्रणांकडून वुहानसंदर्भात दिली जाणारी माहिती आणि समोर येणारे हे वास्तव यांची तुलना केल्यास चीन सरकार किती मोठ्या प्रमाणात माहिती घडवत होते याचा खुलासा होतो.

अमेरिकन संशोधकांनी आपल्या लेखात, वुहानमधील कोरोना साथीच्या बळींचा आकडा किमान ३६ हजार असावा असा दावा केला आहे. चीनच्या सरकारी यंत्रणांनी वुहानमधील बळींची संख्या फक्त अडीच हजार असल्याचे दाखविले आहे. वुहानमधील रुग्णांची संख्याही चिनी यंत्रणांनी फक्त ५० हजारांच्या जवळ दाखवली आहे. मात्र अमेरिकी संशोधकांनी आपल्या लेखात ही संख्या किमान तीन लाख असू शकते असे म्हटले आहे.

यापूर्वीही विविध माध्यमे तसेच संशोधकांनी लिहिलेल्या लेखांमधून कोरोना साथीबाबत चीनचा खोटेपणा उघड झाला होता. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे चीनमध्ये ४,६३३ जणांचा बळी गेला तर ८२,९४१ कोरोनाबाधित आपल्या देशात असल्याचे चीनने घोषित केले होते. पण कोरोनाव्हायरसची साथ चीनच्या तब्बल २३० शहरांमध्ये पसरली होती व या साथीचे सुमारे साडेसहा लाख रुग्ण आढळले होते, अशी धक्कादायक माहिती चीनच्याच लष्करी विद्यापीठाच्या नोंदवहीमुळे जगासमोर आली होती. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीने चीनमधील कोरोना साथ गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच सुरू झाल्याचे म्हटले होते.

ऑस्ट्रेलियन दैनिकातील वृत्ताने चीनकडून सुरू असलेल्या लपवाछपवीला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला आहे.

leave a reply