‘ऑकस डील’ म्हणजे युरोपिय महासंघासाठी ‘वेक अप कॉल’

पॅरिस/कॅनबेरा – ‘ऑस्ट्रेलिया, ब्रिटन व अमेरिकेत झालेला पाणबुड्यांचा करार युरोपिय महासंघासाठी वेकअप कॉल आहे. युरोपिय देश एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू शकत नाहीत. महासंघातील सदस्य देशांनी परस्परांमधील मतभेद मिटवून एकमुखाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे’, असा इशारा जर्मनीचे युरोपियन अफेअर्स विभागाचे मंत्री मायकल रॉथ यांनी दिला. ‘ऑकस डील’च्या मुद्यावरून फ्रान्स आक्रमक झाला असून, त्याचे परिणाम नाटोच्या एकजुटीवर होऊ शकतात, असे ब्रिटनच्या माजी राजनैतिक अधिकार्‍यांनी बजावले आहे. युरोपिय महासंघानेही फ्रान्सच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असून ‘ऑकस डील’च्या मुद्यावर स्वतंत्र बैठकही बोलावली आहे.

‘ऑकस डील’ म्हणजे युरोपिय महासंघासाठी ‘वेक अप कॉल’गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने अमेरिका व ब्रिटनबरोबर आण्विक पाणबुड्यांसह इतर संरक्षणविषयक सहकार्याचा समावेश असलेला करार केला होता. हा करार होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची फ्रान्सबरोबर पाणबुड्यांच्या कराराबाबत बोलणी सुरू होती. ऑस्ट्रेलियाने फ्रेंच कंपनीशीही संपर्क साधला होता. या पार्श्‍वभूमीवर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अथवा ब्रिटन यापैकी कोणत्याही देशाने फ्रान्सशी संवाद न साधता करार केल्याने फ्रान्स चांगलाच दुखावला गेल्याचे समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी फ्रान्सने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील आपल्या राजदूतांना माघारी बोलावले होते. मात्र फ्रान्स एवढ्यावरच थांबला नसून हा मुद्दा युरोपियन अस्मितेचा असल्याची भूमिका घेतली आहे.

‘ऑकस डील’ म्हणजे युरोपिय महासंघासाठी ‘वेक अप कॉल’फ्रान्ससह युरोपिय महासंघ यापुढे आघाडी व भागीदारीच्या संकल्पनेवर फेरविचार करेल, असे फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन य्वेस-द्रिआन यांनी बजावले. मुद्दा फक्त संरक्षण करार तोडण्याचा नसून मित्रदेशांमधील विश्‍वासाचा भंग ही गंभीर बाब आहे असेही फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले. फ्रान्सचे युरोपियन अफेअर्स विभागाचे मंत्री क्लेमेन्ट ब्युन यांनी, काही झालेच नाही अशी भूमिका घेऊ नये, असे वक्तव्य केले आहे. फ्रान्सच्या या आक्रमकतेला युरोपिय महासंघानेही समर्थन दिले आहे. सोमवारी युरोपिय महासंघाने या मुद्यावर विशेष बैठकही बोलावली आहे. युरोपिय महासंघाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डर लेयन यांनीही, फ्रान्सला दिलेली वागणूक स्वीकारार्ह नसल्याचे बजावले आहे.

‘ऑकस डील’ म्हणजे युरोपिय महासंघासाठी ‘वेक अप कॉल’फ्रान्स व युरोपिय महासंघाच्या या आक्रमक भूमिकेचे परिणाम नाटोतील एकजुटीवर होऊ शकतात असे ब्रिटनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍यांनी बजावले आहे. ‘ऑकस डीलमुळे नाटो व नाटो सदस्य देशांवरील फ्रान्सचा विश्‍वास निश्‍चितच डळमळीत झाला आहे. त्यामुळे पुढील काळात ते युरोपच्या सामरिक स्वायत्ततेवर अधिक भर देण्याची शक्यता आहे. नाटोसाठी ही बाब धक्का देणारी आहे, कारण नाटो विश्‍वासावर अवलंबून आहे’, असा इशारा ब्रिटनचे माजी राजनैतिक अधिकारी पीटर रिकेट्स यांनी दिला. रिकेट्स फ्रान्समध्ये राजदूत तसेच नाटोतील प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. दरम्यान, फ्रान्सने ब्रिटनबरोबरील संरक्षण विषयक चर्चा पुढे ढकलली आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियादरम्यान व्यापक संरक्षण सहकार्य करार करण्यात आला आहे. ‘ऑकस डील’ असे नाव असलेल्या या करारानुसार, अमेरिका व ब्रिटन ऑस्ट्रेलियाला आठ आण्विक पाणबुड्या पुरविणार आहे. त्याव्यतिरिक्त दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, सायबर तंत्रज्ञान, आर्टिफिशल इंटेलिजन्स, क्कांटम तंत्रज्ञान या क्षेत्रातील परस्पर सहकार्यावरही एकमत झाले आहे.

leave a reply