अमेरिका मानवी कचराकुंडी बनली आहे

- माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जळजळीत टीका

मानवी कचराकुंडीवॉशिंग्टन – ‘अमेरिकेत लक्षावधी अवैध निर्वासित घुसत आहेत. त्यांना रोखण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. हे अवैध निर्वासित त्यांना हवे तिथे जाऊ शकतात व हवे ते करु शकतात. आपली अमेरिका वेगाने मानवी कचराकुंडी बनत चालली आहे. खुनी, अमली पदार्थांचे तस्कर आणि सर्व प्रकारचे गुन्हेगार या निर्वासितांच्या प्रचंड मोठ्या घुसखोरीचा भाग आहेत’, अशी घणाघाती टीका माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मेक्सिको सीमेवरून घुसणार्‍या निर्वासितांच्या समस्येला लक्ष्य करताना ट्रम्प यांनी हे संकट म्हणजे ‘क्रायसिस क्रायसिस’ झाल्याचा टोलाही लगावला आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. ट्रम्प यांचे धोरण रद्द करण्याचा निर्णय बायडेन व डेमोक्रॅट पक्षाकडून निर्वासितांबाबत स्वीकारण्यात येणार्‍या सौम्य भूमिकेचा भाग आहे. याच सौम्य भूमिकेमुळे गेले काही महिने अमेरिकेत लाखो निर्वासितांचे लोंढे धडकले असून सीमेवरील राज्यांमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचेही समोर आले आहे. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी निर्वासितांच्या लोंढ्यांना अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी अधिकच मोकळे रान देत असल्याचे समोर येत आहे.

मानवी कचराकुंडीबायडेन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात अवैध निर्वासितांना रोखण्यासाठी घेतलेले बहुतांश निर्णय रद्द केले होते. त्याचवेळी अमेरिकेत राहणार्‍या एक कोटींहून अधिक बेकायदा निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी नवे विधेयकही संसदेत सादर केले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने बायडेन प्रशासनाला दणका देत ट्रम्प यांचे ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरण राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पुन्हा लागू करावे, असा आदेश दिला होता. त्यामुळे बायडेन प्रशासन निर्वासितांच्या मुद्यावर सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या काही दिवसात टेक्सास प्रांतातील ‘डेल रिओ’ भागात हजारो निर्वासितांचे लोंढे एकामागोमाग धडकण्यास सुरुवात झाली आहे. यात बहुतांश हैतीतील नागरिकांचा समावेश आहे. बायडेन प्रशासनाने या भागातील निर्वासितांना रोखणार्‍या चौक्या बंद केल्याने निर्वासितांची बिनधास्त घुसखोरी सुरू आहे. यासंदर्भातील माहिती व फोटोग्राफ्स माध्यमांमधून समोर आल्याने बायडेन प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी बायडेन यांना चांगलेचा धारेवर धरले असून ट्रम्प यांची टीकाही त्याचाच भाग दिसत आहे. यापूर्वीही ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर निर्वासितांच्या त्सुनामी धडकत असल्याचा आरोप केला होता.

हैती तसेच आफ्रिकी देशांमधून निर्वासितांचे लोंढे धडकत असून देशातील आघाडीची प्रसारमाध्यमे त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ठपकाही ट्रम्प यांनी ठेवला आहे. ही निर्वासितांची समस्या फक्त सीमेवरील संकट नसून देशासमोरील सर्वात मोठे संकट असल्याचा दावाही माजी राष्ट्राध्यक्षांनी केला. अवैध निर्वासितांच्या वाढत्या लोंढ्यांमुळे अमेरिकेच्या ‘टेक्सास’ प्रांतातील गव्हर्नरनी आधीच ‘इमर्जन्सी’ची घोषणा केली आहे.

leave a reply